पीयूष गोयलजी, घाणेरडं राजकारण थांबवा; राष्ट्रवादीचा टोला

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला रविवारी संबोधित केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नांवर भाष्य करताना चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर रेल्वे मंत्रालयाकडून मागणीपेक्षा कमी रेल्वेगाड्या सोडण्यात येत असल्याचं सांगत त्यांनी केंद्राकडून होणाऱ्या दिरंगाईवर टीका केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यातील वाद शिगेला पोहचला आहे. यानंतर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याकडून सातत्याने महाराष्ट्र सरकारकडे विचारणा करणारे ट्विट होत असून, कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी ‘हे घाणेरडं राजकारण आणि तुमच्या मनाचे खेळ थांबवण्याचे आवाहन गोयल यांना केले आहे.

मागील दोन दिवसांपासून रेल्वेमंत्री राजकारण करत आहेत. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवरून (एलटीटी) ४९ रेल्वे गाड्या सोडण्यात येतील, असं त्यांनी सांगितलं होतं. दुसरीकडे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सांगत आहेत की, १६ गाड्यांपेक्षा जास्त गाड्या आम्ही सोडू शकत नाही. ४९ गाड्यांच्या हिशोबानं तिथे प्रवासी जमा झाले आणि रेल्वे प्रशासन गाड्या सोडण्यासाठी तयार नाही. आम्हाला वाटतं रेल्वेमंत्री पीयूष गोयल, रेल्वे विभाग आणि केंद्र सरकार जाणूनबजून राजकारण करत आहे. हे योग्य नाही. ‘एलटीटी’वर जी परिस्थिती निर्माण झाली, त्याला पीयूष गोयल जबाबदार आहेत. ४९ रेल्वे तुम्ही सोडणार होतात. त्या सोडा. प्रवासी येऊन उभे आहेत, गर्दी वाढत आहे. जी परिस्थिती निर्माण होत आहे, त्याची जबाबदारी पीयूष गोयल यांची आहे. त्यांनी घाणेरडे राजकारण आणि मनाचे खेळ थांबवावेत,” अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER