फक्त अयोध्याच का? हिंदू धर्मात चारधाम आहेत, तेथेही जा : नवाब मलिक

Nawab Malik & Devendra Fadnavis

मुंबई : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेत पक्षाध्यक्ष राज ठाकरे मार्चमध्ये अयोध्येला जाणार असल्याचे सांगितले. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अयोध्या दौऱ्याच्या घोषणेनंतर महाराष्ट्रातील राजकारण तापू लागले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी देवेंद्र फडणवीस यांना सणसणीत टोला लगावला. नुसतं एका ठिकाणी जाऊन चालत नाही, हिंदू धर्मात चारधाम आहेत. त्यामुळे लोकांनी केवळ अयोध्येत जाण्याऐवजी बद्रीनाथ किंवा पशुपतीनाथ येथेही जावे, असे नवाब मलिक यांनी म्हटले.

ते शुक्रवारी मुंबईत पत्रकारांसोबत बोलत होते. यावेळी त्यांना राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याविषयीही विचारणा करण्यात आली. तेव्हा नवाब मलिक यांनी प्रत्येकाला आपापली आस्था जपण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. उद्धव ठाकरे, राज ठाकरे किंवा अन्य कुठलेही नेते असोत प्रत्येकाची आस्था असते. या देशात प्रत्येकाला धर्मस्वातंत्र्य आहे. हा प्रत्येक नागरिकाचा मौलिक अधिकार आहे. त्यामुळे ते त्यांना हवं त्याठिकाणी जाऊ शकतात, असे मलिक यांनी म्हटले.

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाचवेळी अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्याने आता राज्यात पुन्हा एकदा मनसे आणि भाजपच्या युतीची चर्चा सुरु झाली आहे. याविषयी विचारणा केली असता नवाब मलिक यांनी, कोणी कोणासोबत युती करावी, हा त्यांचा अधिकार असल्याचे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER