‘शेतकऱ्यांना धीर देणे ही पवारांची सुरुवातीपासूनची भूमिका’ – नवाब मलिक

Nawab Malik-Sharad Pawar.jpg

मुंबई: ‘कोंबडा आरवला किंवा नाही आरवला तरी सकाळ होते. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची त्या कोंबड्यासारखीच अवस्था झाली आहे’, अशी जहरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राष्ट्रीय प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केली आहे.

माझ्यामुळे इतर पक्षाचे लोक बाहेर पडले आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. त्याला नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कोंबडयाला वाटतं की मी आरवलो नाही तर सकाळ होणारच नाही पण प्रत्यक्षात तसं काहीही घडत नसतं. कोंबडा झोपला तरी सकाळ होते हे देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात घ्यावे, असा टोला मलिक यांनी लगावला.

‘आमचे नेते पवारसाहेब असतील किंवा मंत्री असतील सर्वच जण शेतकरी संकटात सापडल्यावर त्यांना धीर देण्यासाठी शेताच्या बांधावर लगेच जातात. शेतकऱ्याला धीर देणं ही पवारांची आणि पक्षाची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी उगाचच काहीही दावे करू नयेत,’ असा सल्ला मलिक यांनी दिला.

दरम्यान, कुठल्याही शेतकऱ्याला या काळात अडचणीत राहू देणार नाही. शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका सरकार लवकरच घेणार आहे. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकार निश्चितरूपाने मदत जाहीर करेल, असेही नवाब मलिक यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही सरकारकडे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करणार असल्याचे जाहीर केले आहे. शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेसुद्धा दौऱ्यावर आहेत.ते दौऱ्याहून परत आल्यावर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निश्चितपणे भरपाई देण्याची भूमिका असेल. त्याचबरोबर इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यावर केंद्राचीही मदत करण्याची जबाबदारी असल्याचेही नवाब मलिक यांनी नमूद केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER