पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल; नवाब मलिक यांचे स्पष्टीकरण

Nawab Malik

आज सायंकाळी ४ वाजता बैठक आहे. सगळं ठरलं की, दोन दिवसांत राज्यपालांकडे जाऊ आणि सरकार स्थापनेचा दावा करू.


मुंबई : विधानसभेच्या निकालानंतर अनेक दिवसांपासूनचा सत्तास्थापनेचा पेच अखेर सुटला आहे. राज्यात शिवसेना -राष्ट्रवादी – कॉंग्रेस महाविकास आघाडीचे सरकार येणार हे जवळपास ठरले आहे. तसेच ज्या मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेने भाजपसोबत काडीमोड घेतली ते मुख्यमंत्रिपदही शिवसेनेला आघाडीने पूर्ण पाच वर्षांसाठी दिले असल्याची माहिती स्वतः राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.

मध्यरात्री पवार-ठाकरे भेट, चर्चा सकारात्मक; आजच सत्ता स्थापनेचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी “पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, आम्ही पाठिंबा देऊ.” असं स्पष्ट केलं. मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे स्पष्ट केले आणि मुख्यमंत्रिपदाच्या वाटाघाटीच्या चर्चांवर पडदा टाकला. “मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल. जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर उत्तम, ते सरकारचा चेहरा ठरू शकतात. सत्तासंघर्ष संपला आहे. आज सायंकाळी ४ वाजता बैठक आहे. सगळं ठरलं की, दोन दिवसांत राज्यपालांकडे जाऊ आणि सरकार स्थापनेचा दावा करू. ते लक्ष देतील ही अपेक्षा आहे.

किमान समान कार्यक्रमाचा अजेंडा आज पूर्ण होईल. दोन दिवसांत गुड न्यूज मिळेल.” असं नवाब मलिक यांनी सांगितलं. राष्ट्रवादीला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद हवं आहे का, असा प्रश्न विचारला असता, त्या केवळ चर्चाच आहेत, अफवांवर विश्वास ठेवू नका, असंही नवाब मलिक म्हणाले. महाराष्ट्रात आघाडी करताना नवं नाव ठरवू. युती केल्यानंतर पक्षाचं नाव ठेवण्यात येत नाही.

हे थोतांड मीडियानं पसरवलं आहे, असे म्हणून मलिक यांनी माध्यामांनी ठेवलेल्या महाशिव आणि महाविकास आघाडी या शब्दांवर आक्षेप घेतला. तसेच मलिक म्हणाले, “सरकार धर्मनिरपेक्ष असेल, महाराष्ट्राला विकास हवा आहे. पवारांनी दिल्लीच्या चाणक्याला दाखवून दिलं की नाद करायचा नाही.” असं म्हणत त्यांनी अमित शहांवरही निशाणा साधला.