रोबोटिक्स आणि वैज्ञानिक प्रतिकृतींच्या फिरत्या प्रदर्शनाचे नवाब मलिक यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई  :- सलाम बॉम्बे फाऊंडेशन, मासूम संस्था, नॅशनल सायन्स फाऊंडेशन आदी संस्थांमार्फत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी बनविलेल्या रोबोटिक्स आणि वैज्ञानिक विषयावर आधारित विविध प्रतिकृतींचे (प्रोजेक्ट मॉडेल्स) फिरते प्रदर्शन तयार करण्यात आले आहे. दोन मोबाईल व्हॅनमध्ये हे प्रदर्शन असून राज्याचे कौशल्य विकास आणि अल्पसंख्याक विकास मंत्री श्री. नवाब मलिक यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. 4 मार्चपर्यंत हे प्रदर्शन मुंबईतील नेहरु सायन्स सेंटर, भाभा अणुसंशोधन केंद्र यासह शहरातील विविध शाळांमधून फिरणार आहे.

सलाम बॉम्बे फाऊंडेशनमार्फत शालेय विद्यार्थ्यांना विविध रोबोटिक, मोबाईल रिपेअरींग, होम अॅप्लायन्सेस रिपेअरिंग, ऑटोमोबाईल रिपेअरिंग, ग्राफीक डिझाईन, वेब डिझाईनिंग, ब्युटी अॅण्ड वेलनेस, ज्वेलरी डिझाईन, बेकरी अॅण्ड कॉन्फेक्शनरी आदी विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणातील विद्यार्थी आणि त्यांनी तयार केलेल्या उपकरणांचे या फिरत्या विज्ञान प्रदर्शनात सादरीकरण करण्यात आले आहे.

मंत्री श्री. मलिक म्हणाले की, सलाम बॉम्बे फाऊंडेशन, मासूम संस्था आदींमार्फत राबविण्यात येत असलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. सलाम बॉम्बे फाऊंडेशनने आतापर्यंत सुमारे 15 हजार गोरगरीब विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या सक्षमीकरणासाठी कार्य केले आहे. राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत तरुणांना कौशल्य विकासाची विविध प्रशिक्षणे देऊन बेरोजगारी कमी करण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येत आहे. या कामात विविध स्वयंसेवी संस्थांचेही सहकार्य घेऊन ही मोहीम अधिक गतिमान केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दीपेंद्रसिंह कुशवाह, सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या संस्थापक संचालक पद्मिनी सोमाणी, मुख्य कार्यकारी अधिकारी नंदिनी रामचंद्रन, उपाध्यक्ष गौरव अरोरा, सहायक महाव्यवस्थापक जयशाली तांबे, मासुम संस्थेचे प्रोग्राम हेड मोहम्मद अश्रफ हाश्मी आदी मान्यवर उपस्थित होते.