‘जनजीवन कधी रुळावर येईल या प्रश्नाचे उत्तर असे मिळेल वाटलं नव्हतं’, मनसेने वाहिली श्रद्धांजली

औरंगाबाद :- जिल्ह्यातील सटाणाजवळ आज पहाटे झालेल्या रेल्वे दुर्घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. बदनापूर ते करमाडदरम्यान मालगाडीखाली चिरडून १६ मजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी पहाटे घडली. या अपघामध्ये १४ जणांचा जागीच मृत्यू झाला तर उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या मजुरांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने श्रद्धांजली अर्पण केली आहे. पक्षाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून या घटनेचा उल्लेख ‘सुन्न करणारं मृत्युतांडव’ असा करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेसंदर्भात दु:ख व्यक्त केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही ट्विटवरून या घटनेसंदर्भात एक रेल्वे रुळांचा फोटो पोस्ट करत मृत मजुरांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. “जनजीवन कधी रुळावर येईल? या प्रश्नाचं असं उत्तर मिळेल हे वाटलं नव्हतं… संभाजीनगरचं (औरंगाबाद) मृत्युतांडव सुन्न करणारं… महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. ” अशा ओळी या फोटोवर लिहिलेल्या आहेत.