नवनीत राणांचे कौतुक : तीन महिन्यांचा पगार शहीद जवानाच्या कुटुंबाला; पुढील पगार शेतकऱ्यांना देणार

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) या त्यांच्या वेगवेगळ्या उपक्रमातून नेहमीच चर्चेत असतात. आताही त्यांनी असाच एक मोलाचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन महिन्यांचा पगार शहीद जवानाच्या कुटुंबाला आणि त्यानंतरचा हा पगार शेतकऱ्यांना देणार असल्याची घोषणा नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केली आहे. यासाठी त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

अमरावती जिल्ह्यातील पिंगळखुटा इथल्या जवान कैलास दहीकर यांचा कर्तव्यावर असताना कुल्लू मनालीत मृत्यू झाला. त्यामुळे अकाली जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशा कठीण परिस्थितीत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आपला खासदारकीचा पगार शहीद कैलास दहीकर यांच्या कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल २ लाख ५१ हजार रुपयांचा पगार हा नवनीत राणा यांनी शहीद जवानाच्या कुटुंबाला दिला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सैनिक कैलास यांच्या आईवडील आणि पत्नीला हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. अमरावतीत एका कार्यक्रमात हा धनादेश देण्यात आला आहे.

नवनीत राणा या नेहमीच त्यांच्या खास उपक्रमांमुळे चर्चेत असतात. कधी त्या शेतात जाऊन शेतकऱ्यांसोबत काम करतात तर कधी शेतकऱ्यांसाठी उपोषणाला बसतात. त्यामुळे आताही खासदार राणा यांच्या या निर्णयामुळे सर्व स्तरातून त्यांचं कौतुक करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER