मनसेत (MNS) मोठं इनकमिंग; आज नवी मुंबईतील विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

Raj Thackeray

मुंबई: मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) (MNS) मोठ्याप्रमाणात इनकमिंग सुरु असल्याचे दिसून येत आहे. आज नवी मुंबईतील अनेक जण मनसेत प्रवेश करण्यासाठी कृष्णकुंज येथे पोचणार आहेत. यामध्ये विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे सर्वजण राज ठाकरेंच्या (Raj Thackeray)उपस्थितीत आज मनसेत प्रवेश करतील.

काही दिवसांपूर्वीच पुण्यातील युवासेनेचे उपनेते संग्राम माळी हे मनसेच्या गोटात सहभागी झाले होते. सोबतच शिवडी आणि वरळीतील शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनीही मनसेत प्रवेश केला होता. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बाब मनसेसाठी फायदेशीर मानली जात आहे.

लॉकडाऊननंतरच्या काळात सामान्य नागरिक, कामगार संघटना आणि व्यापाऱ्यांच्या अनेक शिष्टमंडळांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली होती. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर यापैकी अनेकांचे प्रश्नही निकाली लागले आहेत. त्यामुळे अलीकडच्या काळात मनसेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढली आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी बेस्टच्या हंगामी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावला होता. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी सेवेत सामावून घेण्यात आले होते. हे कर्मचारी सोमवारी राज ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी कृष्णकुंजवर येणार आहेत.

ऑक्टोबर महिन्यात शहापूर तालुक्यातही शिवसेनेला मोठे खिंडार पडल्याचे पाहायला मिळाले. मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत शेकडो शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश झाला. तत्पूर्वी कल्याण-डोंबिवली भागातील शिवसेना आणि भाजपमधील शेकडो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेतला. माजी आमदार प्रकाश भोईर आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख वैभव किणी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. शिवसेना भाजपला ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठं खिंडार पडल्याची चर्चा आहे.

दरम्यान, जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच शिवसेना-युवासेना आणि राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या विभागातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मनसेत प्रवेश केला होता. तर फेब्रुवारी महिन्यात चंद्रकांत खैरेयांचे अत्यंत विश्वासू शिवसैनिक सुहास दशरथे यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला होता. त्यानंतर खैरे यांच्या सात निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात पक्षप्रवेश केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER