नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ : मच्छिमारांच्या योग्य पुनर्वसनासाठी सर्वेक्षण करण्याचे एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरु असून या भागातील मच्छिमारांच्या उपजीविकेसाठी त्यांचे पुर्नवसन होणे अपेक्षित आहे. त्यासाठी त्यांचा सर्वेक्षण करण्यात यावे, असे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मत्स्यव्यवसाय विभागाच्या सचिवांना दिले. मच्छिमार बांधवांचे योग्य पुनर्वसन सिडकोने करावे, असेही श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

नवी मुंबईतील प्रकल्प बाधितांच्या विविध प्रश्नांबाबत मंत्रालयात नगरविकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत नारनवरे, कामगार नेते बबन पाटील, माजी आमदार मनोहर भोईर आदी यावेळी उपस्थित होते.

सिडकोमध्ये प्रकल्पग्रस्तांना रोजगार देण्यात आला आहे. विविध आस्थापनांमध्ये कंत्राटी पद्धतीने ते काम करत असून त्यांचे वेतन, भविष्य निर्वाह निधी आदी मागण्यांबाबत याबैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.

सिडको प्रकल्पग्रस्त म्हणून काम करणाऱ्या भूमिपुत्रांना कंत्राटदाराने शासनाच्या नियमाप्रमाणे किमान वेतन, सुट्ट्या, भत्ते, बोनस दिला पाहिजे. यासाठी सर्व कंत्राटदारांची बैठक बोलावून त्यांना निर्देश द्यावेत. त्याचबरोबर परिवहन कंपनी बंद पडल्यामुळे जे बेरोजगार झाले आहेत, त्यांच्या उदरनिर्वाहासाठी उलवे, करंजाडे, द्रोणागिरी येथे भूखंड, काही ठिकाणी गाळे उपलब्ध करुन द्यावे अशा सूचनाही नगरविकास मंत्र्यांनी यावेळी दिल्या.

सिडकोने प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक ती पावले उचलून त्यांना रोजगाराचीही संधी निर्माण करावी, असेही श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.