पोलिसांनी आत्महत्या करणाऱ्या महिलेचे प्राण वाचवले

Beat marshals save a woman from committing suicide in Kharghar

मुंबई :- नवी मुंबईतील खारघर येथे बुधवारी रात्री पोलिसांनी आत्महत्या करण्यासाठी गळफास घेत असलेल्या महिलेचा जीव वाचवला.

ही घटना सेक्टर-५ मधली आहे. हे नेपाळी जोडपे आर्थिक अडचणीत आहे. महिलेचा पती या भागातल्या चर्चमध्ये सुरक्षा रक्षक आहे. याशिवाय तो मोटारी आणि दुचाकी धुण्याचे काम करतो. लॉकडाऊननंतर त्याचे वाहने धुण्याचे काम बंद पडले. त्यात, त्यांनी एकाला उसने दिलेले १० हजार रुपये त्याने परत दिले नाही. त्यामुळे त्यांची आर्थिक अडचण वाढली. त्यांनी नेपाळला परत जायचे ठरवले; पण लॉकडाऊनमुळे जाणे शक्य नव्हते.

बुधवारी रात्री यावरून पती – पत्नीत वाद झाला. या दाम्पत्याला अडीच आणि सहा वर्षांची दोन मुले आहेत. रागात पत्नी अडीच वर्षाच्या मुलाला घेऊन घरातून बाहेर गेली. ती चर्चच्या मागे असलेल्या झाडांकडे गेली. एका माणसाने तिला एकटीला झाडांकडे जाताना पाहून ही माहिती तेथून जात असलेले पोलीस कॉन्स्टेबल सुनील अंबुरे आणि सतीश मकासरे यांना दिली. ते दोघे लगेच झाडांकडे गेलेत. त्यावेळी महिला दुपट्ट्याने गळफास घेण्याचा प्रयत्न करत होती. पोलिसांनी तिला वाचवले.

पोलीस या कुटुंबाला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेले. महिलेचे समुपदेशन केले. त्यांना जीवनावश्यक किराणा सामान दिले. नंतर काही लागले तर सांगा, असा दिलासा देऊन घरी पाठवले.

कॉन्स्टेबल सुनील अंबुरे आणि सतीश मकासरे यांनी वेळीच मदत करून महिलेचे प्राण वाचवल्याबद्दल खारघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदर यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER