दिलासा तर दिलाच, सोबत कौतुकही केले; मुख्यमंत्र्यांकडून रायगडला १०० कोटींची मदत

CM Uddhav Thackeray

रायगड :- ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली. अलिबागमधील थळ या जास्त झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी ते म्हणाले की, मी येथे दौरा करण्याच्या उद्देशाने आलेलो नसून, विशेषकरून येथील लोकांचे कौतुक करण्यासाठी आलो आहे. चक्रीवादळाच्या संकटावर येथील लोकांनी मात दिली. सरकारी यंत्रणांना सहकार्य केल्यानेच चक्रीवादळापासून होणारे मोठे नुकसान टाळले. आज मी काही भागांची पाहणी केली असून, अशा परिस्थितीत रायगडकरांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. विशेष म्हणजे इथल्या लोकांचं कौतुक करण्यासाठी मी आलेलो आहे. या संकटात जनता, प्रशासन, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पोलीस, एसडीआरएफ यांनी प्रखर झुंज दिली.

सर्वजण श्वास रोखून टीव्हीवर वादळ बघत होते. आपल्याकडे हे वादळ येत नाही ना? अशी भीती अनेकांच्या मनात होती. हजारो लोक श्वास रोखून टीव्हीवर वादळ बघत असताना रायगडमधील नागरिक, प्रशासन या वादळाला तोंड देत होते.

रायगड आणि वादळ, शिवरायांची ही भूमी आहे, वादळं पचवणं हे रायगडसाठी नवं नाही; पण आजची स्थिती वेगळी, पंचनामे होत आहेत, लोकांना स्थलांतरित करून सुरक्षित ठेवलं, जास्तीत जास्त लोकांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला, त्यात यश आलं. सध्या रायगड जिल्ह्यासाठी १०० कोटींची मदत जाहीर करत असून, हे पॅकेज नाही तर मदत आहे. ही मदत १०० कोटींवर मर्यादित न राहता यापुढे जशी जशी गरज भासेल आणखी मदत करण्यात येईल. सध्या १०० कोटी रुपये देण्यात येतील; मात्र या पैशांचा योग्य ठिकाणी वापर व्हावा हाच माझा उद्देश आहे. कामं  झाली पाहिजे मी या मताचा आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

अशा प्रकारची संकटं येतात आणि जातात. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. केंद्रातूनही मदतीचे आश्वासन मिळाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशी माझं बोलणं झालं आहे- अशी माहितीही त्यांनी दिली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER