भीषण आगीतही राष्ट्रकार्य थांबलेले नाही…

Serum Institute

सिरम इन्स्टिट्यूटमधे आग लागून पाच कामगार मरण पावले. गुरुवारी लागलेल्या या आगीनंतर आगीपेक्षाही जास्ती वेगाने त्याची बातमी पसरली आणि थेट राष्ट्रपती रामनाथ कोविन्द (President Ramnath Kovind), पंतप्रधान नरेन्द्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आगीत मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांच्या प्रती संवेदना व्यक्त केल्या. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी घटनास्थळी धाव घेतली, कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनीही घटनास्थळाला भेट दिली. आगीची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, हेही जाहीर करण्यात आलं. हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आग लागलेली असल्याने त्या पातळीर आगीची चौकशी होईल आणि पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून समांतर तपास केला जाईल, असं पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलंय.

सिरम इन्स्टिट्यूटला (Serum Institute) शुक्रवारी भेट दिल्यानंतर सिरमची कोरोना लस सुरक्षित आहे आणि कोव्हीशिल्ड लस उत्पादनाला फटका बसलेला नसून आग प्रकरणाची चौकशी सुरू असून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुण्यामधे सांगितले. सिरममधल्या घटनास्थळाला भेट देऊन दुर्घटनेबाबतची सविस्तर माहिती त्यांनी घेतली आणि सिरम इन्स्ट्यिट्यूटच्या कर्मचाऱ्यांशीही त्यांनी संवाद साधला.

ही दुर्घटना घडली त्या इमारतीमधील पहिले दोन मजले वापरात असून वरील दोन मजल्यांवर नवे केंद्र सुरू केले जाणार होते, त्या ठिकाणी ही दुर्घटना घडली. लस उत्पादन केंद्रालाच आग लागली तर पुढे कसे होणार, अशी भीती सोशल मिडियावरून अनेकांनी व्यक्त केली होती. त्याबरोबरच या आगीच्या दुर्घटनेमागे घातपात नाही ना, अशी शंकाही अनेकांनी सोशल मिडियावरून व्यक्त केली होती. कोविडची लस जिथे बनवली जाते, ते केंद्र एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे आणि त्यामुळे लसनिर्मितीला कोणताही फटका बसलेला नाही. तसा निर्वाळा सिरमचे अदर पूनावाला यांनी दिला आहे. बीसीजी आणि इतर लसीचे नुकसान झाले आहे. कोव्हिशिल्ड लसीचा पुरवठा सुरळीत असून लसीवर परिणाम नाही, हेही पूनावाला नी सांगितलंय.

सिरममधल्या घटनेनंतर अनेक प्रश्न निर्माण होतात. अशी घटना घडल्यानंतर सामान्य माणूस तर सोडाच पण एरवी शक्तीशाली वाटणारा मिडिया म्हणजेच टीव्हीवाले, पेपरवाले यांच्यापैकी कोणीही घटनास्थळी पोहोचू शकले नाहीत. कारण खासगी मालमत्तेमधे त्यातही पूनावाला यांच्यासारख्या प्रभावशाली व्यक्तीच्या कारखान्यामधे घटना घडलेली असल्याने एरवी बातमीच्या ठिकाणी सगळी बंधने झुगारून पोहोचणारे मिडियावाले इथे मात्र दाराबाहेरच थांबवले गेले होते. फार कशाला, पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी सिरमला भेट दिली तेव्हाही मिडियावाले मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच ताटकळत उभे होते. सरकारी माध्यमे म्हणजे दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या पत्रकारांनाही प्रवेशद्वाराच्या आत घेण्यात आले पण इतर पत्रकार दाराबाहेर आणि हे दाराच्या आत इतकाच काय तो फरक होता. आकाशवाणी, दूरदर्शनवालेही पंतप्रधानांनी सिरममधे जे पाहिले ते पाहू शकले नाहीत. संपूर्ण करोना संकटाच्या काळात आणि लशीच्या बातम्या आल्या तेव्हाही अदर पूनावाला खूपच कमी पत्रकारांना भेटले आहेत. मुळात त्यांच्यापर्यंत पोहोचताच येत नाही कारण ते खूप मोठे आहेत.

पुण्यातून लस बनत आहे पण पुण्यातल्या क्वचित कोणी पत्रकाराने लसनिर्मिती कारखाना किंवा नेमकं काय सुरू आहे, हे पाहिलेले नाही. पुण्यातल्या पत्रकारांनी संवेदनशील सुखोई विमानं, लष्करी गुप्तहेर संस्था, विषाणूविज्ञान संस्था अशा ठिकाणी रीतसर प्रवेश करून माहिती घेतलेली आहे पण सिरममधे त्यांना जाता येत नाही. जगभर नाव असलेल्या या कारखान्यात स्थानिक पत्रकारांना प्रवेशाला मज्जाव आहे. वास्तविक लसनिर्मिती हा विषय वैद्यकीय क्षेत्राची पत्रकारिता करणाऱ्यांसाठीही उत्सुकतेचा असू शकतो पण त्यांच्यापैकीही पुण्यातील क्वचित कोणाला सिरममधे प्रवेश असेल, अशी स्थिती आहे. एरवी अशी वागणूक देणाऱ्यांवर थेट बहिष्काराचे अस्त्र उचलणारे माध्यमबांधव सिरमबद्दल मात्र सहिष्णु आहेत कारण सिरम राष्ट्रकार्य, मानवकार्य करत आहे. ते करतानाच थोडा फार आर्थिक लाभ झाला तर ते काही नफेखोरी करणारे नाहीत, असं सांगणारे व्हीआयपी रांगेने उभे राहतील. त्यामुळे आता भीषण आगीला तोंड देऊनही सिरमचे लसनिर्मितीचे राष्ट्रकार्य सुरू, अशा बातम्या आल्या तर आश्चर्य वाटू देऊ नका. त्यांना राष्ट्रकार्याला शुभेच्छा.

शैलेन्द्र परांजपे

‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER