राष्ट्रीय सुरक्षा : श्रीलंकेत लवकरच बुरखाबंदी! मंत्र्यांनी केले जाहीर

Burqa - Sarath Weerasekara - Maharashtra Today

कोलंबो : श्रीलंकेमध्ये (Sri Lanka) लवकरच सार्वजनिक ठिकाणी बुरखा (Burqa) घालण्यावर बंदी येणार आहे, अशी माहिती श्रीलंकेचे जनसुरक्षा मंत्री सरथ वीरसेखरा (Sarath Weerasekara) यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणालेत की, याबाबच्या कागदपत्रांवर मी सही केली असून मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी ते पाठवण्यात आले आहे. श्रीलंकेमधील एक  हजारपेक्षा जास्त मदरशांवर बंदी घालण्याचादेखील निर्णय सरकारने घेतला आहे, असे वीरसेखरा यांनी सांगितले. वीरसेखरा म्हणालेत की, राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे. आमच्या काळात मुस्लिम महिला आणि मुली बुरखा घालत नसत.

बुरखा धार्मिक कट्टरतेचे प्रतीक असून गेल्या काही काळातच प्रचलित झाले आहे. आम्ही नक्कीच बुरख्यावर बंदी आणणार आहोत. मदरशांवर घालण्यात येणाऱ्या बंदीविषयी सरथ वीरसेखरा यांनी सांगितले की, श्रीलंकेतील एक  हजारहून  जास्त मदरशांवर बंदी घालण्याचे नियोजन सरकारने केले आहे. कुणीही शाळा उघडून त्यांना हवे ते मुलांना शिकवू शकत नाही. याआधी २०१९ मध्ये श्रीलंकेमध्ये तात्पुरत्या स्वरूपात बुरख्यावर बंदी घालण्यात आली होती. देशाच्या काही भागांमध्ये झालेल्या बॉम्बहल्ल्यांनंतर हा निर्णय घेण्यात आला होता.

त्याच वर्षी श्रीलंकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष गोटबया राजपक्षे यांची निवड झाली होती. देशात मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याचा आरोप राजपक्षे यांच्यावर करण्यात आला होता. मात्र, त्यांनी हा दबाव जुमानला नाही. २०२०मध्ये कोरोनाच्या संकटकाळात श्रीलंकेमध्ये शवांचे दफन न करता दहन करण्याचा निर्णय श्रीलंका सरकारने जाहीर केला होता. त्यावर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरून टीका झाल्यानंतर, मुस्लिमांना शवांचे दफन करण्याची परवानगी देण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER