‘युरेनियम’प्रकरणी आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून तपास सुरू !

National Investigation Agency

मुंबई : एटीएसकडून (ATS) करण्यात आलेल्या कारवाईत दोन आरोपींना अटक करत सात किलो युरेनियम (Uranium case) जप्त करण्यात आले होते. यानंतर या संदर्भातील पुढील तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आला आहे. यासाठी एटीएसकडून दाखल करण्यात आलेल्या FIRची प्रत राष्ट्रीय तपास यंत्रणेला देण्यात आलेली आहे.

मुंबईतील शिवाजीनगर परिसरामध्ये भंगारचा व्यवसाय करणाऱ्या अबू तहीर चौधरी या आरोपीला एटीएसने अटक केली आहे. मात्र, आता राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) या प्रकरणातल्या आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. जिगर पांड्या आणि अबू ताहीर अशी या आरोपींची नावे आहेत. या दोघांनी ७ किलो १०० ग्रॅम युरेनियमचा साठा मानखुर्दमधल्या एका कारखान्यात लपवून ठेवला होता. हे दोघेही गेल्या वर्षभरापासून हा साठा विकण्यासाठी गुप्तपणे ग्राहक शोधत होते. त्याचबरोबर त्यांनी या साठ्याची किंमत २५ कोटींपर्यंत असल्याचे काही विश्वासू व्यक्तींना सांगितले. न्यायालयाने आरोपींना हजर केले असता त्यांची रवानगी १२ मेपर्यंत एटीएस कोठडीत करण्यात आलेली आहे. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक संतोष भालेकर यांनी दिली.

तब्बल २५ कोटी रुपयांचा सात किलो युरेनियम विकण्याचा प्रयत्न जिगर पांड्याने केला. याबद्दलची माहिती एटीएसला मिळाल्यानंतर त्यांनी या संदर्भात तपास करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला बनावट ग्राहक बनून एक लाख रुपयात या आरोपींकडून काही प्रमाणात ‘युरेनियम’ एटीएसच्या अधिकाऱ्यांनी मिळवले होते. त्याची तपासणी करण्यासाठी सदरचे युरेनियम भाभा ॲटोमिक रीसर्च सेंटर येथे पाठवण्यात आले होते. बीएआरसी येथे मिळालेल्या अहवालानंतर हे युरेनियम असून अतिशय घातक असल्याचे समोर आल्यानंतर एटीएसने या दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

या प्रकरणातले दोन्ही आरोपी हे उच्चशिक्षित आहेत. ते एमबीए पदवीधारक आहेत. जिगर हा एका खासगी आयटी कंपनीत काम करतो, तर ताहीर हा आयात-निर्यात व्यावसायिक आहे. या दोघांकडून जप्त करण्यात आलेले युरेनियम ९० टक्के नैसर्गिक आणि शुद्ध असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत २१ कोटींहूनही अधिक असेल असा अंदाज आहे. NIAने अणु ऊर्जा कायद्यातल्या कलमानुसार या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button