
नवी दिल्ली : ‘नेटफ्लिक्स’ या दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे प्रक्षेपण करणाºया ‘ओटीटी’ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने ‘बॉम्बे बेगम्स’ या त्यांच्या नव्या मालिकेचे प्रसरण तात्काळ बंद करावे, अशी नोटीस राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने (NCPCR) दिला आहे.
या मालिकेत बालकांचे अनुचित पद्धतीने चित्रण व प्रदर्शन करण्यात येत असल्याचे कारण देत आयोगाने ‘नेटफ्लिक्स’ला ही नोटीस पाठविली असून मालिकेचे प्रसारण बंद करून २४ तासांत सविस्तर अहवाल सादर करावा. अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी ताकीदही देण्यात आली आहे.
अलंकृता श्रीवास्तव यांनी या मालिकेचे कथानक लिहिलेले असून जीवनाच्या विविध क्षेत्रांतील मुंबईतील पाच महिलांच्या जीवनावर ती आधारलेली आहे. या मालिकेबद्दल दोन टष्ट्वीटर हॅण्डल्सवरून करण्यात आलेल्या तक्रारींची दखल घेत आयोगाने बालहक्क संरक्षण कायद्याच्या कलम १३(१)(जे) अन्वये अधिकार वापरून ही नोटीस जारी केली आहे.
अल्पवयीन मुलांचे आपसातील लैंगिक संबंध व त्यांनी अमली पदार्थांचे सेवन करणे हीअगदी सहज गोष्ट आहे, अशा प्रकारे या कृतींचे प्रदर्शन मालिकेत करण्यात आल्याची ही तक्रार होती. ‘ही खूप गंभीर बाब’ आहे असे नमूद करून आयोग नोटिशीत म्हणतो की, मालिकेतील अशा प्रकारच्या चित्रणाने तरुण मने बिघडतील एवढेच नाही तर यातून मुलांची पिळवणूक व त्यांच्यावर लैंगिक अत्याचारांचे प्रकारही वाढीस लागू शकतील. मुलांचे कोणत्याही प्रकारचे लैंगिक शोषण होऊ न देणे हा आयोगाचे वैधानिक कर्तव्य आहे, असे नमूद करून नोटीस म्हणते की, मुलांसंबंधीचा अथवा मुलांसाठीचा कोणताही कार्यक्रम प्रसारित करताना ‘नेटफ्लिकेस’ने अधिक काळजी घ्यावी.
अजित गोगटे
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला