आत्मनिर्भर भारतासोबत आता पक्षही आत्मनिर्भर करावा लागेल; मुनगंटीवारांचं सूचक वक्तव्य

Sudhir Mungantiwar

मुंबई : गरज असेल तेथे नेते आयात करण्यात काहीच चुकीचं नाही, मात्र आत्मनिर्भर भारतासोबत आत्मनिर्भर पक्ष बनवावा लागेल, असे थेट विधान भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. लोकमत यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

एकनाथ खडसे , चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे , प्रकाश मेहता अशा अनेक नेत्यांना पक्षाने बाजूला ठेवले याविषयी आपली भूमिका काय? असा प्रश्न त्यांना विचारला असता ते म्हणाले की, ज्यांच्या कष्टावर, श्रमाच्या भरवश्यावर पक्ष मोठा झाला. वाढला आणि ज्यांनी अनेक वर्ष पक्ष विस्तारासाठी संघर्ष करत काम केले, त्यांना जो पक्ष विसरून जातो, त्या पक्षाला भविष्यात अस्तित्वासाठी खूप संघर्ष करावा लागतो. जुन्या लोकांना विसरून चालत नाही. आम्ही त्याची काळजी घेतो घेत आहोत. भविष्यातही नव्याने पक्षात येणाऱ्या लोकांना कार्यक्षमतेनुसार संधी देण्यात गैर नाही. मात्र जुन्याजाणत्या अनुभवी नेत्यांचा विसर पक्षाने पडू देऊ नये. असे झाले तर पुढचे पाठ, मागचे सपाट होईल. राजकारणात हे होऊ नये, अशी आपली स्पष्ट भूमिका आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील भविष्यात हीच भूमिका घेतील असेही मुनगंटीवार म्हणाले.

आपण पाच वर्ष वित्तमंत्री होता. आपल्या कार्यकाळात आरोग्य विभागाला किती निधी दिला गेला? असा प्रश्न केला असता मुनगंटीवार म्हणाले, मलाईदार खाती हा प्रकार आता बंद करायला हवा. भविष्यात मुख्यमंत्र्यांनी आरोग्य आणि कृषी यासारखी खाती आपल्याकडे ठेवायला हवी. तरच त्याचा योग्य तो उपयोग होईल. कोरोनाचे संकट आता समोर आले. आमच्या काळात हे संकट नव्हते. त्यामुळे या विभागाला निधी दिला पाहिजे हे लक्षात आले नाही. पेट्रोलविना गाडी चालत होती, पण आता लक्षात आले की पेट्रोलशिवाय गाडी चालत नाही. त्यामुळे आता यापुढे नक्कीच बदल दिसून येतील, असेही मुनगंटीवार म्हणाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER