नाथाभाऊंना फडणवीस सॉफ्ट टार्गेट वाटले!

Eknath Khadse - Devendra Fadnavis

‘मी देवेंद्रला मोठं केलं’ असं एकनाथ खडसे नेहमी सांगतात. विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून खडसे (Eknath Khadse) बोलायचे तेव्हा त्यांच्या अगदी पाठीशी बसलेले देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) त्यांना एकेक मुद्दा आणि कागद पुरवायचे हे सगळ्यांनी पाहिलंच आहे. राजकारण हा संधीचा खेळ असतो. मुख्यमंत्रिपदाची संधी फडणवीस यांना मिळाली. इतर काहींच्या मानाने ते ज्युनिअर होते हे खरेच; पण एकदा एक व्यक्ती मुख्यमंत्री झाल्यानंतर पक्ष आणि सरकारमधील लोकांनी त्या खुर्चीचा आदर करायचा असतो. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), पंकजा मुंडे (Pankaja Munde) वा विनोद तावडे (Vinod Tawde) हे फडणवीसांचे निकटवर्ती कधीही नव्हते, प्रसंगी त्यांचे पक्षांतर्गत विरोधक असाच त्यांचा परिचय; पण खुर्चीच्या आदराचं भान त्यांनी सार्वजनिकरीत्या तरी नेहमीच ठेवलं. फडणवीसांशी त्यांचे खटके उडले तरी संबंध टोकाला गेले नाहीत.

खडसेंकडून मात्र ते भान सुटत गेलं. ‘कालचा पोरगा मला शहाणपण शिकवतो काय?’ या तोऱ्याने नाथाभाऊंमध्ये आणि फडणवीस यांच्यात दरी पडणं सुरू झालं. मुनगंटीवारांसारखे मंत्री अधिकृत वा खासगी बैठकीत एखाद्या मुद्यावर बोलताना, ‘मला मुख्यमंत्री साहेबांशी बोलावं लागेल’ असं म्हणायचे; पण ‘मला कोणाला विचारायची काय गरज आहे?’ असा दर्प नाथाभाऊंच्या बोलण्यातून जाणवायचा. मंत्रालयात अनेक जण या गोष्टीचे साक्षीदार आहेत. मंत्री कितीही ज्येष्ठ आणि महत्त्वाची खाती सांभाळत असले तरी अंतिम अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो हे लक्षात ठेवून मंत्र्यांनी काम करायचे असते. येताजाता मुख्यमंत्र्यांच्या जातीचा उद्धार करीत एकेरीत बोलणे कुठे तरी दिल्लीच्या कॅमेऱ्यात टिपले गेलेच असेल ना! फडणवीस यांना मोदी-शहांनी नेमलेले होते. फडणवीसांशी पंगा म्हणजे दिल्लीशी पंगा हे खडसेंना कळलेच नाही. भाजप मंत्र्यांच्या आणि विशेषत: पक्षाचे असलेल्यांच्या व्यवहारांची आचारसंहिता मोदींनी ठरवून दिलेली आहे हेही समजून घ्यायला हवे होते. झाडावर चढणे जमले तसे उतरण्याचीही कला अवगत पाहिजे.

नाही तर माणूस झाडावर लटकून राहण्याचीच शक्यता अधिक असते. ‘भाजपबद्दल, मोदी-शहांबद्दल माझी कुठलीही तक्रार नाही. फडणवीसांनी छळल्यामुळे मी भाजप सोडतोय’ हे खडसे यांचे विधान म्हणजे फडणवीसांवर निशाणा साधताना पक्षातील इतरांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न दिसतो. मोदी-शहांशी आपण पंगा घेऊ शकत नाही आणि घेतला तरी त्यात आपलेच नुकसान होईल याचे राजकीय शहाणपण त्यांच्याकडे नक्कीच आहे. फडणवीस ‘सॉफ्ट टार्गेट’ आहेत असं त्यांना वाटलं असावं. मात्र, खडसेंच्या मुद्यावर मोदी-शहा भक्कमपणे फडणवीस यांच्या बाजूने उभे राहिले हे दिसलेच. खडसेंनी पक्षांतर्गत पुनर्वसनासाठी दबावाची भाषा सातत्याने केली; पण पक्षश्रेष्ठींनी त्यास दाद दिली नाही. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना शेवटपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला; पण पुनर्वसन कसे करणार याबाबत कुठलाही शब्द दिला नाही; कारण, ते त्यांच्या हातातच नव्हते.

ते ज्यांच्या हातात होते त्या मोदी-शहा-नड्डांनी खडसेंचे पुनर्वसन कोणत्याही परिस्थितीत नाही, असा ठाम निर्णय घेतलेला होता. हे लक्षात आल्यानेच खडसेंना हातात घड्याळ बांधावे लागले असे दिसते. तोडपाणीचा आरोप करणाऱ्यांबरोबर खडसे नारळपाणी प्यायला निघाले आहेत. खडसेंच्या पक्षांतराचा थोडाबहुत फटका भाजपला खान्देशात नक्कीच बसेल. मोदीलाटेत त्यांच्या सूनबाई मोठ्या फरकाने लोकसभेवर निवडून गेल्या; पण स्वत: खडसे २०१४ च्या निवडणुकीत कमी मताधिक्याने जिंकले. २०१९ मध्ये कन्या रोहिणी यांना ते जिंकून आणू शकले नाहीत ही दुसरी बाजू आहेच.

Disclaimer :- ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER