सिडनी कसोटीत खेळला तर नटराजन घडवणार इतिहास

T. Natarajan

थंगारासू नटराजन… (Thangarasu Natarajan) तामिळनाडूचा हा भेदक डावखुरा गोलंदाज जिथे जातो तिथे आपली छाप पाडतोय. आयपीएल (IPL) असो की आंतरराष्ट्रीय क्रिकेट…प्रत्येक ठिकाणी मिळालेल्या संधीचे त्याने सोनं केलंय म्हणूनच तो आता भारतीय क्रिकेटमध्ये एक वेगळा इतिहास लिहिण्याच्या मार्गावर आहे.

ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या तिसऱ्या कसोटीसाठी (India Vs Australia Third Test) त्याचा उमेश यादवच्या जागी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. 7 जानेवारीपासून सिडनी येथे खेळल्या जाणाऱ्या या कसोटीत तो खेळला तर टी-20, वन डे आणि कसोटी या तिन्ही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच दौऱ्यात पदार्पण करणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरेल.

त्याहूनही अद्भुत बाब ही की या तिन्ही प्रकारच्या संघात तो नियमीत खेळाडू नव्हता तर बदली खेळाडू म्हणून संघात आलाय. बदली खेळाडू म्हणून तिन्ही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा तर तो जगातील एकमेव आहे.

नटराजनच्या आधी एकाच दौऱ्यात तिन्ही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण करणारे टीम साऊथी, पॕट कमिन्स, राकिबूल हसन, जो रुट, हामिश रुदरफोर्ड असे 18 खेळाडू आहेत पण एकही भारतीय नव्हता आणि बदली खेळाडू म्हणून तिन्ही प्रकारात पदार्पण करणारा तर अजुनही जगात दुसरा कुणीच नाही.

मुळात या दौऱ्यावर तो कोणत्याही नियमीत संघात नव्हता. त्याला सरावासाठीचा नेट गोलंदाज म्हणून भारतीय संघासोबत नेण्यात आले होते पण नियमीत खेळाडूंना दुखापती होत गेल्या आणि नटराजनला संधी मिळत गेली. टी-20 सामन्यांसाठी वरुण चक्रवर्तीच्या जागी तो संघात आला. नवदीप सैनीच्या दुखापतीने त्याला वन डे संघात स्थान मिळवून दिले आणि आता उमेश यादव बाद झाल्यानंतर त्याने कसोटी संघातही स्थान मिळवले आहे.

टी-20 मालिकेत 6 बळी मिळवून तो सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला होता तर एकमेव वन डे सामन्यात त्याने मार्नस लाबूशेनसह दोन गडी बाद केले होते. आता कसोटीत संधी मिळाली तर तो काय कमाल दाखवतो याची उत्सुकता आहे.

सिडनी कसोटीत खेळला तर झहीरखाननंतर भारतासाठी खेळणारा तो पहिलाच डावखूरा जलद गोलंदाज ठरेल. भारतीय संघात फेब्रुवारी 2014 पासून डावखुरा जलद गोलंदाज खेळलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER