नटराजन ‘असा’ पहिलाच भारतीय क्रिकेटपटू

Thangarasu Natarajan

थंगारासू नटराजन… (Thangarasu Natrajan) तामिळनाडूच्या हा भेदक डावखुऱ्या गोलंदाजाने आयपीएलनंतर टी-20, वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पणाप्रमाणेच आपल्या कसोटी पदार्पणातही छाप पाडली आहे. ब्रिस्बेन कसोटीच्या पहिल्याच दिवशी त्याने शतकवीर मार्नस लाबुशेनसह दोन बळी मिळवले आहेत आणि टी-20, कसोटी व वन डे क्रिकेटच्या पदार्पणातच किमान दोन बळी मिळवणाऱ्या मोजक्या खेळाडूंच्या पंक्तीत तो जाऊन बसलाय. त्याच्याआधी झहीर खान, जसप्रीत बुमरा, प्रज्ञान ओझा व नवदीप सैनी हे असे यशस्वी गोलंदाज आहेत.

याशिवाय एकाच मालिकेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात पदार्पण करणारा तो पहिलाच भारतीय ठरलाय. खरं तर सिडनी येथील तिसऱ्या कसोटीतच त्याने हा इतिहास घडवला असता कारण त्यावेळी त्याचा उमेश यादवच्या जागी भारतीय संघात समावेश करण्यात आला होता पण त्याला खेळवलं गेले नव्हते. मात्र आता जसप्रीत बुमराला झालेल्या दुखापतीनंतर त्याला खेळवण्याशिवाय पर्यायच नव्हता.

अद्भुत बाब ही की या तिन्ही प्रकारच्या संघात तो नियमीत खेळाडू नव्हता तर बदली खेळाडू म्हणून संघात आलाय. बदली खेळाडू म्हणून तिन्ही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा तर तो जगातील एकमेव आहे.

नटराजनच्या आधी एकाच दौऱ्यात तिन्ही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण करणारे टीम साऊथी, पॕट कमिन्स, राकिबूल हसन, जो रुट, हामिश रुदरफोर्ड असे 18 खेळाडू आहेत पण एकही भारतीय नव्हता आणि बदली खेळाडू म्हणून तिन्ही प्रकारात पदार्पण करणारा तर अजुनही जगात दुसरा कुणीच नाही.

टी-20 सामन्यांसाठी वरुण चक्रवर्तीच्या जागी तो संघात आला. नवदीप सैनीच्या दुखापतीने त्याला वन डे संघात स्थान मिळवून दिले आणि उमेश यादव बाद झाल्यानंतर त्याने कसोटी संघातही स्थान मिळवले आणि आता जसप्रीत बुमराच्या दुखापतीनंतर त्याने प्लेइंग इलैव्हनमध्ये स्थान मिळवले आहे.

टी-20 मालिकेत 6 बळी मिळवून तो सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला होता तर एकमेव वन डे सामन्यात त्याने मार्नस लाबूशेनसह दोन गडी बाद केले होते.

नटराजनने 2 डिसेंबर 2020 रोजी आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला आणि तेंव्हापासून आता 44 दिवसात तो भारतासाठी कसोटी,वन डे आणि टी-20 असे तिन्ही सामने खेळलाय. हा 44 दिवसांचा अवधीही भारतासाठी सर्वात जलद आहे.

सर्वात कमी काळात तिन्ही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण

12 दिवस- पीटर इंन्ग्राम (न्यूझीलंड)- 2010
15 दिवस- एजाज चिमा (पाकिस्तान)- 2011
16 दिवस- काईल अबॉट (द.आफ्रिका)- 2013
17 दिवस- डग ब्रेसवेल (न्यूझीलंड )- 2011
18 दिवस- चार्लटन शुभा (झिम्बाब्वे)- 2020
44 दिवस- टी. नटराजन (भारत) – 2020- 21

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER