अनधिकृत फेरीवाल्यांकडून मराठी माणसाला झालेली मारहाण सहन करणार नाही – नितेश राणे

Nitesh Rane

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) मुंबईत फेरीवाल्यांविरोधात पुकारलेल्या आंदोलनात आता काँग्रेसचे आमदार आणि स्वाभिमान संघटनेचे प्रमुख नितेश राणेही सहभागी झाले आहे.

नितेश यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटच्या काँग्रेसच्या भूमिकेवर टीका केली असून मराठी माणसाला झालेली मारहाण सहन करून घेणार नाही. मग तो कुठल्याही पक्षाचा असेल, असा इशारा दिला आहे.

काल सकाळी माळवदे मालाड स्थानकाबाहेर फेरीवाल्यांचा निषेध करण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांसह गेले असताना पोलिसांनी प्रसंगावधान राखून माळवदे यांना अटक केली. माळवदे यांना अटक आणि सुटका झाल्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास पुन्हा ते स्थानकाबाहेर गेले. त्यावेळी फेरीवाल्यांच्या जमावाने माळवदे यांना जबर मारहाण करत त्यांना गंभीर जखमी केले. यामध्ये माळवदे यांच्या डोक्‍याला व हाताला गंभीर दुखापत झाली होती. या संपूर्ण प्रकरणाला संजय निरुपम जबाबदार असल्याचा आरोप केला जातो आहे. काँग्रेसच्या संजय निरुपमांनी फेरीवाल्यांना चिथावणी दिल्याचा आरोप मनसेने केला आहे. दरम्यान, आज राज ठाकरे माळवदे यांच्या भेटीसाठी बोरिवलीत येणार आहेत.

मारहाणीचा विरोध करत नितेश राणे आपल्या ट्विटरच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला खडे बोल सुनावले आहे . ते म्हणाले की, काँग्रेसला आपली ओळख फक्त उत्तर भारतीयांचा पक्ष अशीच ठेवायची आहे का? काँग्रेसला मराठी माणसांच्या मतांचीही गरज आहे. पण तुर्तास तसे दिसत नाही, असे नितेश यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. राज ठाकरे यांनी फेरीवाल्यांविरोधात आंदोलन छेडल्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या राजकीय व्यक्तीने त्यांना समर्थन दिले आहे. काही दिवसांपूर्वी नितेश यांचे वडील नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ स्थापन केला होता. मात्र, त्यावेळी नितेश यांनी त्या पक्षात प्रवेश केला नव्हता. मात्र, आता नितेश यांनी अप्रत्यक्षपणे मनसेच्या भूमिकेला पाठिंबा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.