नारळीकर स्पर्शाने साहित्यविश्व उजळणार…

jayant narlikar

Shailendra Paranjapeसंमेलनाध्यक्ष म्हणून नवोदितांना वाव मिळेल, यासाठी प्रयत्न करेन आणि विज्ञानविषयक लेखन मराठीतून जास्ती झाले की भाषाही समृद्ध होते, ही नारळीकर सरांची प्रतिक्रिया येत्या वर्षभरात मराठी भाषेत नक्कीच ठोस काही होईल, असं आश्वस्त करणारी आहे.

जागतिक कीर्तीचे खगोलवैज्ञानिक आणि मराठीसह इतर भाषांमधून विज्ञान प्रसार करून त्याबद्दल जागतिक पातळीवरचा युनेस्कोचा सर्वोच्च कलिंगा पुरस्कार मिळवणारे जयंत नारळीकर नाशिकच्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले आहेत. याच लेखमालेच्या आठ दिवसांपूर्वीच्या लेखातून आम्ही पुढीलप्रमाणे अपेक्षा व्यक्त केली होती. नारळीकर सरांची संमेलनाध्यक्षपदी एकमतने निवड व्हावी कारण संमेलनाच्या इतिहासात शंभर वर्षात न झालेली गोष्ट घडेल आणि ती म्हणजे विज्ञानाच्या मूलभूत संशोधनाच्या क्षेत्रात जागतिक दर्जाची कामगिरी बजावून विज्ञानप्रसाराच्या क्षेत्रातही मराठी भाषेतून जागतिक पातळीवर दखल घेतले जाईल, असे काम केलेल्या एका संशोधक लेखकाला संमेलनाध्यक्षपदाचा मान मिळेल. त्यासाठी नारळीकर सरांच्या अटी स्वीकारून त्यांना हा मान द्यायला हवा. तो दिल्याबद्दल अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदनच करायला हवे.

नारळीकर सरांचे वडील विष्णुपंत नारळीकर केंब्रिजमधून पंडित मदनमोहन मालवीयजी यांच्या निमंत्रणानुसार बनारसमधे अध्यापन करण्यासाठी दाखल झाले. त्यामुळे नारळीकर सरांचे बालपण बनारसमधे गेले. त्या काळात विष्णुपंत नारळीकर यांच्याकडे त्यांचे सहकारी अध्यापक असलेले सर्वपल्ली राधाकृष्णन तसेच नारायणराव व्यास (पंडित सी आर व्यास यांचे काका) अशी मातब्बर मंडळी येत असत. नारळीकर सरांच्या मातोश्री संस्कृत विदुषी आणि बालपणी त्या जयंत नारळीकर सरांना पी जी वुडहाऊसच्या गोष्टी वाचून दाखवत असत. त्यामुळे बनारससारख्या शहरात हिन्दी माहोलमधे चंद्रकांतासारख्या हिन्दी साहित्याचं वाचन, इंग्रजीतल्या पी जी वुडहाऊससारख्या आणि मराठीतल्या चिं वि जोशींसारख्या लेखकाच्या निर्विष विनोदावर भरणपोषण झालेले नारळीकर सर त्यांच्या व्याख्यानातून आणि अनौपचारिक संभाषणातूनही एक प्रकारचं मृदू, संयमित, विनोदबुद्धी प्रखर असलेलं व्यक्तिमत्व प्रतिबिंबित करतात पण त्याबरोबरच ते शांत मृदू असले तरी आपल्या विचारांबद्दलची सुस्पष्टता आणि ठामपणा याबद्दल कधीच तडजोड करत नाहीत, हे त्यांना ओळखणाऱ्या सर्वांनाच माहीत आहे.

नारळीकर सर संमेलनाध्यक्ष झाल्यामुळे भाषा व्यवहारात एक प्रकारचं मार्दव, विनोदबुद्धी ज्ञानाची प्रखरता हे तर आणतीलच पण चुकीच्या प्रथांना संयत पण ठाम विरोध करण्याची त्यांची पद्धत हेही संमेलनापासूनच लोकांना लक्षात येईल, आचरणात आणता येईल. थोरांचे वागणे इतरांसाठी अनुकरण असते, त्याने समाज व्यवहारही सुधारत असतात. हे सारे शक्य आहे आणि ते संबंधितांनी शक्य करून दाखवायला हवे, हे आम्ही आठ दिवसांपूर्वीच्या लेखातही मांडले होते.

नारळीकर सरांचे आत्मचरित्रपर पुस्तक त्याच्या अगदी थेट साध्या `चार महानगरातला माझा प्रवास’ या शीर्षकापासूनच त्यांचे थेटपण दाखवून देते. संपूर्ण आयुष्य बुद्धिप्रामाण्यवादी धारणेने जगलेले नारळीकर सर फलज्योतिष हे विज्ञान नाही, ही ठाम भूमिका घेऊन उभे राहिले होते. तसेच कुंडली बघून भविष्य सांगता येत नाही, हे आव्हान देताना त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष नरेन्द्र दाभोलकर यांच्यासह मोहीमही चालवली होती. विज्ञानप्रसार आणि अंधश्रद्धा निर्मूलन या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे मानणारे नारळीकर सर एकूणच मराठी साहित्य व्यवहारामधे एक प्रकारचा बुद्धिप्रामाण्यवाद आणतील, ही आशा करायला हरकत नाही.

नारळीकर सर संमेलनाध्यक्ष झाले म्हणून सारं काही एका रात्रीत चमत्कार होऊन बदलेल, ही आशा नाही. पण किमान उपचारांच्या बाबी असलेल्या अनेक गोष्टी ते ठामपणे विरोध करून बंद करू शकतील. त्याबरोबरच संमेलनाध्यक्षपद म्हणजे आता उरलो सत्कारापुरता, असे न राहता १९६३-६४ साली राष्ट्रपतींच्या निमंत्रणावरून भारताचे पाहुणे म्हणून येऊन भारतभर आपल्या खगोलशास्त्रातल्या कामावरची व्याख्याने देत देशभर फिरलेले आणि अभूतपूर्व गर्दीचे विक्रम मोडणारे नारळीकर सर महाराष्ट्रभर मराठी भाषा आणि एकूणच साहित्य आणखी समृद्ध करण्यासाठीही प्रयत्न करतील, यशस्वी होतील, अशा शुभेच्छा त्यांना देऊ यात. नारळीकर सर, आपले अभिनंदन.

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER