नर्गिसने मीनाकुमारीच्या मृत्यूनंतर असे काही म्हटले की, सगळे अवाक झाले

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याला श्रद्धांजली वाहताना त्याच्या आठवणी जाग्या केल्या जातात. तो किती चांगला होता यापासून ते त्याच्या करिअरबाबत अनेक महत्वाच्या गोष्टी श्रद्धांजलीच्या भाषणात सांगितल्या जातात. बॉलिवूडमध्ये (Bollywood) अनेक कलाकारांचे आपसात जमत नाही. व्यावसायिक कटुता असल्याने ते एकमेकांसोबत कामही करीत नाहीत. परंतु असे असले तरी एखाद्याच्या निधनानंतर त्याच्याबाबत कोणीही वावगे बोलत नाही. असे असताना जेव्हा बॉलिवूडमधील ट्रॅजेडी क्वीन मीनाकुमारीचे (Meenakumari) निधन झाले तेव्हा नर्गिस (Nargis) यांनी जे वक्तव्य केले त्याने सगळे बॉलिवूड चकित झाले होते. त्यावरून नर्गिसला अनेकांच्या रोषाचा सामनाही कराला लागला होता. पण नर्गिस यांनी ते वक्तव्य का केले याचा खुलासा जेव्हा एक लेख लिहून केला तेव्हा मात्र बहुतेकांनी नर्गिस यांच्या वक्तव्याशी सहमती दर्शवली होती.

बॉलिवूडमध्ये मीना कुमारी यांना ‘ट्रॅजेडी क्वीन’ म्हणून ओळखले जाते. मीना कुमारी यांचे निधन अत्यंत कमी वयात झाले होते. वयाच्या फक्त 38 व्या वर्षी निधन झालेल्या मीना कुमारी मृत्यूच्या दोन दिवस आधीपासून कोमामध्ये होत्या. बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात करणाऱ्या मीना कुमारी यांनी 33 व्या वर्षापर्यंत जवळ जवळ 92 सिनेमांमध्ये काम केले होते. अत्यंत कमी वयात त्यांनी प्रचंड लोकप्रियता आणि यश प्राप्त केले होते. मीना कुमारी यांच्यासोबत काम करण्यास तेव्हाचे सगळे नायक एका पायावर तयार असत. मीना कुमारी सिनेमात असली की तो सिनेमा हिट होतो असे तेव्हा म्हटले जात असे. करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असतानाच मीना कुमारी यांनी निर्माता-दिग्दर्शक कमाल अमरोही यांच्याशी लग्न केले होते. परंतु या दोघांनाही हे लग्न मानवले नव्हते.

लग्नानंतर सतत होत असलेल्या वाद आणि मारहाणीमुळे मीना कुमारी यांनी दारुला जवळ केले होते. त्या सतत दारु पीत असत. मीना कुमारीच्या घरातून नेहमी आरडाओरडा ऐकू येत असे. या सगळ्या जाचाला कंटाळून मीना कुमारी यांनी घटस्फोट घेतला होता. घटस्फोटानंतर त्या जास्तच दारु पिऊ लागल्या होत्या. त्यामुळे त्यांची किडनी खराब झाली होती आणि त्या सतत आजारी पडत असत.

सिनेमात काम करतानाच नर्गिस आणि मीना कुमारी यांची चांगली मैत्री झाली होती. मीना कुमारीच्या निधनानंतर नर्गिस यांनी “मीना कुमारी, मृत्यूनिमित्त तुझे अभिनंदन!” नर्गिस यांच्या तोंडी हे वाक्य ऐकताच तेथे उपस्थित सगळेच चकित झाले होते. या वक्तव्यामुळे नर्गिस यांच्यावर खूप टीकाही करण्यात आली होती. अखेर नर्गिस यांनी एक लेख लिहिला आणि त्यात त्यांनी या वक्तव्यामागची पार्श्वभूमी सांगितली. लेखात नर्गिस यांनी लिहिले होते, “मृत्यूचे अभिनंदन. मी असे यापूर्वी कधीही कोणासाठीही म्हटले नव्हते, पण मीना, आज मोठी बहीण म्हणून मृत्यूने गाठल्याने मी तुझे अभिनंदन करीत आहे. अभिनंदन करताना मी तुला सांगते की, या जगात तू पुन्हा कधीही येऊ नकोस. हे जग तुझ्यासारख्या लोकांसाठी नाही. यासोबतच मीनाकुमारीच्या आजाराची माहिती कशी झाली तेसुद्धा नर्गिस यांनी या लेखात लिहिलेले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER