राणे-ठाकरेंमधील दुरावा कमी, राणेंचा एक फोन आणि मुख्यमंत्र्यांकडून फाईली क्लिअर

Naryan Rane & Uddhav Thackeray

मुंबई : भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात विस्तव जात नाही हे सर्वानाच ठाऊक आहे. नारायण राणे उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. टीकेचा स्तरही अगदी खालच्या पातळीचा असतो. पण त्याच राणेंवर चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करण्याची वेळ आली. आणि मुख्यमंत्र्यांनीही चांगला प्रतिसाद देत त्यांचं अडलेले काम पूर्ण केलं. यामाध्यमातून राणे-ठाकरेंमधील दुरावा कमी होत असल्याचं बोललं जात आहे.

सिंधुदुर्गात नारायण राणे यांनी मेडिकल कॉलेजची स्थापना केली आहे. त्याचे उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या मेडिकल कॉलेजच्या काही फायली मुख्यमंत्र्याच्या कार्यालयात आल्या होत्या. त्यानिमित्ताने राणेंना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करावा लागला. परवानगीसाठी फाईल मुख्यमंत्र्यांकडे गेली होती. त्यावेळी मी त्यांना फोन केला. तुमच्याकडे परवानगीसाठी फाईल आली आहे, सही करा असं त्यांना सांगितलं. त्यावर मुख्यमंत्री ठीक आहे बोलले. ते म्हणाले, माझ्याकडे फाईल आली आहे का? मी म्हटले, जीआर काढा. रुटीन फाईल आहे. तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले बरं. आमच्या दोघांमध्ये तेवढाच संवाद झाला, असं राणे म्हणाले.

त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी काही राजकीय किंवा कौटुंबीक विषयावर बोलणं झालं का? असा सवाल माध्यमांनी राणेंना केला. त्यावर सगळेच संवाद मीडियासमोर उघड करायचे नसतात, असं सांगत राणेंनी राजकीय चर्चांना हवा दिली आहे. राणे यांच्या या विधानाचे अनेक अर्थ काढले जात आहेत. मेडिकल कॉलेजच्या निमित्ताने राणे-ठाकरेंमधील दुरावा कमी होत असल्याचं सांगितलं जात आहे. मेडिकल कॉलेज होणं हे राणेंचं स्वप्न होतं. मनात आणलं असतं तर उद्धव ठाकरे यांनी या कामात अडथळा निर्माण केला असता. पण त्यांनी राणेंच्या फायली क्लिअर केल्या. त्यामुळे दोन्ही नेत्यांमधील सुसंवादाचा मार्ग तयार झाला आहे, असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER