तुमच्या सर्व कुंडल्या माझ्याकडे, आम्ही मागे लागलो तर झोप लागणार नाही – नारायण राणे

Naryane rane & Uddhav Thackeray

सिंधुदुर्ग : तुम्ही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत. आम्ही तुमच्या मागे लागलो तर तुमच्यासाठी अवघड परिस्थिती निर्माण होईल, असा अप्रत्यक्ष इशारा विरोधकांना देणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना भाजपचे खासदार नारायण राणे (Naryane Rane) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मोदीसाहेबांना आणि अमित शहांना पोकळ धमक्या देऊ नका, आम्ही येथे समर्थ आहोत. तुमच्या सर्व कुंडल्या माझ्याकडे, आम्ही मागे लागलो तर झोप लागणार नाही, असा पलटवार नारायण राणे यांनी केला.

संजय राऊत यांनी नुकतीच ‘सामना’ दैनिकासाठी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना अप्रत्यक्ष इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर ‘टीव्ही-९ मराठी’शी बातचीत करताना नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले. आम्हाला नका सांगू हात धुऊन मागे लागू. कोण कोणाच्या मागे लागेल हे लवकरच कळेल. माझ्याकडे १०० टक्के कुंडल्या आहेत. त्यामुळे मातोश्रीच्या आतल्या आणि बाहेरच्या अशा सर्वांची पळता भुई थोडी होईल. आम्ही मागे लागलो तर तुम्हाला झोप येऊ देणार नाही, असा इशारा नारायण राणे यांनी दिला.

यावेळी नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीकास्त्र सोडले. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष केवळ सत्तेसाठी एकत्र आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस तर केवळ मंत्रिपदांसाठी शिवसेनेसोबत गेली, अशी टीका नारायण राणे यांनी केली.

महाविकास आघाडी सरकारचा एक वर्षाचा कारभार निष्क्रिय आणि महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणारा आहे. कुठलंही ज्ञान नसलेला मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला म्हणून महाराष्ट्र पिछाडीवर चालला आहे. याला जशी शिवसेना जबाबदार तेवढेच आघाडी सरकारच्या सत्तेत असणारे दोन्ही पक्ष जबाबदार आहेत, त्यांचीही तेवढीच नैतिक जबाबदारी असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले.

तसेच आपण मंत्रालयात स्वत: गाडी चालवत जातो, असे उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’च्या मुलाखतीत सांगितले. पण महाराष्ट्राला कर्तबगार मुख्यमंत्री हवाय, ड्रायव्हर नकोय. उद्धव ठाकरे एक वर्ष आमदार आणि मंत्र्यांनाच भेटले नाहीत. जनतेला तर त्यांचे दर्शनही झाले नाही, अशी टीका नारायण राणे यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER