मुख्यमंत्र्यांना अधिवेशन आणि कॅबिनेटची बैठक नकोच, नारायण राणेंची टीका

Naryane rane & Uddhav Thackeray

कुडाळ : राज्य सरकारने केवळ दोन दिवसांसाठी हिवाळी अधिवेशन घेतल्याने त्यावरून भाजप नेते नारायण राणे यांनीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अधिवेशनही नकोय आणि कॅबिनेटची बैठकही नकोय, अशी घणाघाती टीका नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली आहे.

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही टीका केली. दोन दिवसांच्या अधिवेशनात तुम्ही कुठले प्रश्न सोडवणार आहात? दोन दिवसांत शोक प्रस्ताव तरी मांडता येतील का? असा खोचक प्रश्न उपस्थित करतानाच मुख्यमंत्र्यांना अधिवेशनही नकोय आणि कॅबिनेटची बैठकही नको आहे, अशी टीका राणे यांनी केली. कोरोना महामारीमुळे राज्य आर्थिक संकटात आहे. राज्याची अर्थव्यवस्था दिवाळखोरीकडे नेण्याचं काम सरकारकडून केलं जात आहे. देशातील कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रात सर्वाधिक 48,000 मृत्यू झाले आहेत. हे पाप आताच्या सरकारचं आहे. कोरोना काळात या सरकारने काय उपाय योजना केल्या आहेत? राज्याची अत्यंत दयनीय अवस्था करून सोडली आहे, असंही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी मराठा आंदोलनाच्या प्रश्नावरूनही सरकारला धारेवर धरले. मराठा आंदोलनाला या सरकारने दाबण्याचा, दडपण्याचा प्रयत्न केला तर त्याचे पडसाद राज्यात उमटतील आणि त्याला हे सरकार सर्वस्वी जबाबदार असेल असा इशाराही त्यांनी दिला. विरोधी पक्षाने मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिवेशनात मांडू नये म्हणून दोन दिवसाचं अधिवेशन घेतल्याचा आरोप देखील त्यांनी केला. तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी आणलेल्या कृषी कायद्यांना विरोधी पक्ष विरोध करून शेतकऱ्यांच्या भावना भडकवत असल्याचेही त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER