केंद्राकडून नारायण राणेंना वाय दर्जाची सुरक्षा, तर निलेश राणेंना मोठी जबाबदारी

मुंबई : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांची सुरक्षा कमी केली होती. तर भाजपचे नेते नारायण राणे यांची सुरक्षा काढून घेण्यात आली होती. पण आता केंद्र सरकारकडून नारायण राणे (Narayan Rane) यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.

राज्यातील आजी माजी मंत्र्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने सरकारने घेतला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सुरक्षेत सुद्धा कपात करण्यात आली होती. त्याचबरोबर नारायण राणे यांच्याकडे असलेली वाय दर्जाची सुरक्षा काढून घेतली होती. ठाकरे सरकारच्या या निर्णयामुळे भाजपने सडकून टीका केली होती.

पण, आता केंद्राने ठाकरे सरकारला दणका दिला आहे. नारायण राणे यांना केंद्राकडून वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिसांकडून सुरक्षा काढल्यानंतर केंद्र सरकारने सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे. नारायण राणे यांच्या सुरक्षेसाठी आता 12 सीआयएसएफचे कमांडो तैनात असणार आहे.

त्याबरोबर भाजपकडून नारायण राणे यांचा कुटुंबीयांकडे आणखी एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नारायण राणे यांचे सुपूत्र निलेश राणे (Nilesh Rane) यांची पक्षाच्या प्रदेश सचिवपदी निवड करण्यात आली आहे. निलेश राणे हे ट्वीटरवर महाविकास आघाडी सरकारवर एकदाही टीका करण्याची संधी सोडत नाही. आता निलेश राणे यांना भाजपने प्रदेश सचिवपद देण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER