अखेर नारायण राणेंची काँग्रेसला सोडचिट्टी; आमदारकीचाही राजीनामा

Narayan-Rane

सिंधुदुर्ग : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी अखेर आज काँग्रेसला रामराम ठोकला आहे. शिवाय त्यांनी कुडाळ विधान परिषदेच्या आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. मागील अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज असलेले नारायण राणे काँग्रेसला सोडचिट्टी देणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. शेवटी घटस्थापनेच्या दिवशी राणेंनी ‘तुम्ही काय माझी हकालपट्टी कराल, मीच काँग्रेस सोडतो,” अश्या शब्दात सिंधुदुर्गच्या कुडाळमधील आयोजित पत्रपरिषदेत काँग्रेसला सोडचिट्टी दिल्याची घोषणा केली. आज दोन वाजता सोनिया गांधींना पत्र पाठवले आणि 2 वाजून 35 मिनिटांनी सभापतींकडे आमदारकीचा राजीनामा पाठवला असं राणे म्हणाले.

यावेळी बोलताना नारायण राणे म्हणालेत,’ काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन पाळले नाही. काँग्रेसने आपला वापर करून घेतला. मुख्यमंत्रिपद देण्याचं आश्वासन देऊन मला चार वेळा हुलकावणी देण्यात आली, असा आरोप हि त्यांनी केला. आम्हाला सहा महिने द्या आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करु असं अहमद पटेल मला सुरुवातीला म्हणाले होते. परंतु दिलेले आश्वासन पाळण्यात आले नाही अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही आपल्याला मुख्यमंत्री करणार असे आश्वासन दिले होते. परंतु मला न करता पृथ्वीराज चव्हाण याना मुखमंत्री करण्यात आले. काँग्रेसमध्ये माझ्याशी कसे वागले त्यांच्याबाबत मी आज सांगणार असे ही त्यांनी यावेळी म्हटले. शिवाय, विलासराव देशमुख यांच्यानंतर मी मुख्यमंत्री होणार होतो असेही त्यांनी सांगितले. अहमद पटेल यांच्या सांगण्यावरुन विलासराव देशमुखांविरोधात तक्रार केली असे ही ते म्हणालेत. महसूल मंत्री पद मला देण्याचे ठरले होते परंतु ते पद न देता महसूल उद्योग खातं दिलं तेव्हाच राजीनामा देणार होतो असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना राणे म्हणालेत, राज्यातील अनेक नेते आणि पदाधिकारी काँग्रेस पक्ष सोडणार आहेत. २५ नगरसेवक आताच माझ्यासोबत काँग्रेसचा राजीनामा देत आहेत. आता लवकरच आम्ही पुढचा निर्णय आणि भविष्यातील वाटचाल काय असणार हे स्पष्ट करू, असे राणे यावेळी म्हणाले. उद्यापासून ( शुक्रवार) महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. नागपूरपासून माझ्या दौऱ्याची सुरुवात करणार आहे, असे राणे यांनी यावेळी जाहीर केले.