
सिंधुदुर्ग :- आज सिंधुदुर्ग येथे भाजप (BJP) नेते नारायण राणे (Narayan Rane) यांच्या लाईफटाईम या वैद्यकीय महाविद्यालयाचे लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्घाटनप्रसंगी बोलताना नारायण राणे यांनी शिवसेनेसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार प्रहार केला. विकासकामांना विरोध आणि उद्घाटनाला आयत्या बिळावर नागोबा म्हणजे शिवसेना, असं म्हणत त्यांनी शिवसेनेसह मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. या उद्घाटनाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही उपस्थित होते.
यावेळी नारायण राणे म्हणाले, या महाविद्यालयाचा दगड ठेवला तेव्हापासून मोठा विरोध झाला. शिवसेनेने याला मोठा विरोध केला. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी नवं रुग्णालय उभारणार आणि त्यासाठी ९०० कोटी रुपये देण्याचीही घोषणा केली. मात्र, तिजोरीत एक पैसा नाही आणि चालले ९०० कोटी रुपये द्यायला, असे म्हणत मिस्कील टीका केली. कोकणात विमानतळ होणार होतं तेव्हाही विरोध करत आंदोलन करणारी शिवसेनाच होती. विकासकामांना विरोध करायचा आणि उद्घाटनांना आयत्या बिळावर नागोबासारखं येऊन बसायचं यालाच शिवसेना म्हणतात, असंही मत नारायण राणे यांनी व्यक्त केलं.
यावेळी नारायण राणे यांनी उद्घाटनाला अमित शहा (Amit Shah) यांनाच बोलावण्याचं कारणंही स्पष्ट केलं. ते म्हणाले, विरोध झाला तरी वैद्यकीय महाविद्यालय अखेर सुरू झालं. त्यामुळे याच्या उद्घाटनालादेखील असाच डेअरिंगवाला माणूस हवा अशी मागणी सर्वांनी केली. मी तुम्हाला दिल्लीत भेटून महाविद्यालयाच्या उद्घाटनाला येण्याची विनंती केली. तुम्ही तत्काळ होकार दिला, असे म्हणत राणेंनी अमित शहांचे आभार मानले.
ही बातमी पण वाचा : नारायण राणे महाराष्ट्राचे दबंग नेते, झोप विसरून मेहनत करतात – देवेंद्र फडणवीस
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला