कंगना आली, सेनेचं नाक कापलं आणि घरी गेली, राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

Naryane Rane & Uddhav Thackeray

मुंबई : कंगना रनौत (Kangana Ranaut) मुंबईत दाखल झाली. ती तिच्या घरी सुखरूप पोहचली. तिने प्रतिक्रिया दिली आणि शिवसेनेचं नाक कापलं. मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था आहे का? हा माझा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) प्रश्न आहे. कंगना जर मुंबई महाराष्ट्राचा अपमान करत असेल, तर कायद्यात असलेल्या तरतुदीनुसार कारवाई करा. मुख्यमंत्री मातोश्रीच्या पिंजऱ्यात कशाला बसलाय, अशी खोचक टीका भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, आज कंगनाविरोधात भारतीय कामगार सेनेचे कर्मचारी मुंबई विमानतळावर आंदोलन करत होते. मोजून ६७ जण होते. आमच्या लोकांनी मोजले. मुंबईत मराठी माणूस फक्त ३० टक्के उरलेत. शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा 50 टक्के मराठी लोकसंख्या होती. आता एका मतदारसंघातून मराठी माणूस निवडून येईल अशी परिस्थिती नाही. मराठी माणूस कुठे आहे? या परिस्थितीला शिवसेना जबाबदार असल्याची टीका त्यांनी केली.

मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची मानसिकता नव्हती. कारण सरकारकडून एकही नावाजलेला वकील नव्हता. सरकारनं सगळे नात्यागोत्यातले उभे केले होते. नुकतच विधानसभेचं पावसाळी अधिवेशन झालं त्यात थोडी चर्चा करणं आवश्यक आहे. असं अधिवेशन घ्यायचं असेल तर ‘मातोश्री’च्या गच्चीवर घ्या, अशा शब्दांत अशी टीका राणे यांनी केली.

अधिवेशनाच्या कामकाजावर बोलताना राणे म्हणाले की, करोनाची स्थिती हाताळण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. करोनाची स्थिती हाताळण्यात राज्य सरकार कसे अपयशी ठरले आहे, याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मुद्देसूद भाषण केले. मात्र फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या एकाही मुद्द्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले नाही. दोन दिवसाच्या अधिवेशनात सत्तारूढ पक्षाच्या प्रतिनिधींनी गोंधळ घातल्याने अनेक विधेयके चर्चेविनाच मंजूर केली गेली.

जर नियतीनं भविष्यात कधी अधिवेशन घेण्याची वेळ आलीच. तर पुढचं अधिवेशन मातोश्रीच्या गच्चीवर घ्यावं, तास दोन तासांचं,” असा टोला राणे यांनी लगावला. कोकणात वादळाच्या मदतीचे आजपर्यंत एकही रुपया पोहोचलेला नाही. मुख्यमंत्र्यांपेक्षा एखादा सरपंच चांगला बोलला असता, असे नारायण राणे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER