रश्मी बागलांना उमेदवारी दिल्यास मी गप्प बसणार नाही – आमदार नारायण पाटील

narayan patil rashmi bagal

सोलापूर :  पहिल्यांदा निवडणुकीला उभे राहिल्यावर अनेक पहिलवानांना  काय कळतंय, याला मुंबई कुठे आहे माहीत आहे का, अशी टर उडवली. मोठ्या संघर्षाने मी आमदार झालो. रश्मी बागल यांच्या शिवसेना प्रवेशाने शिवसैनिक संभ्रमात आहेत . रश्मीताई व मी दोघेही उमेदवारीच्या शर्यतीत आहोत. आमच्यापैकी एकाला तिकीट मिळाले तर दुसरा गप्प बसणार नाही. त्यामुळे करमाळ्यात आम्हा दोघांनाही उमेदवारी देऊ नये, दिल्यास बंडखोरी निश्चित आहे, असा इशारा आमदार नारायण पाटील यांनी दिला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बार्शीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस आमदार  दिलीप सोपल, माजी आमदार  दिलीप माने, करमाळ्याच्या रश्मी बागल यांच्यासह इतर नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. इतर पक्षातील नेत्यांच्या येण्यामुळे निष्ठावंतांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी हुतात्मा स्मारक येथे पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना पाटील यांनी मनातील खंत बोलून दाखवली आहे.

ही बातमी पण वाचा : कुणाची ऑफर आली तर नक्की विचार करू : हर्षवर्धन जाधव

शिवसेनेचा भगवा हातात घेतल्याने आमदार होण्याची इच्छा पूर्ण झाली. आज रश्मीताईंच्या प्रवेशामुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे आम्हाला दोघांनाही उमेदवारी न देता सावंत बंधूंपैकी कोणीही एकाने करमाळ्यातून विधानसभेची निवडणूक लढवावी. आम्ही एकदिलाने तुमचे काम करू. सर्व जण मांडवाखालून गेले पाहिजेत, तुमची टर्म झाल्यावर रश्मीदीदींना संधी द्या, अशी मागणी नारायण पाटील यांनी यावेळी केली.

दरम्यान, पाटील यांच्या व्यक्तव्याचा समाचार घेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो सर्वांना  मान्य करावाच लागेल. शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या सर्व जागा काबीज करण्याचे ध्येय सर्वांनी ठेवायला हवं, असं सहसंपर्कप्रमुख प्रा.  तानाजी सावंत म्हणाले.