नाओमी ओसाका व प्रशिक्षक बाजीन वेगळे झाले

Naomi seperates from Basjin

टोकियो: जगातील सर्वोच्च क्रमांकाची टेनिसपटू, जपानची नाओमी ओसाका हिने प्रशिक्षक साशा बाजीन यांच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. २१ वर्षीय नाओमीने स्वतः सोमवारी एका व्टिटद्वारे हा निर्णय जाहीर केला. त्यात तिने म्हटले आहे,” मी यापुढे साशांची मदत न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी माझ्यासाठी जे काही केलंय त्यासाठी मी त्यांना धन्यवाद देते आणि भविष्यासाठी शुभेच्छाही देते.”

साशा यांच्यासह विलक्षण प्रगती केलेली नाओमी पंधरा दिवसांपूर्वीच अॉस्ट्रेलियन ओपन जिंकून जगातील पहिल्या क्रमांकाची खेळाडू बनली होती.

बाजीन यांनीसुध्दा नाओमीचा निर्णय आनंदाने स्विकारला आहे. तिच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटलेय, ” धन्यवाद नाओमी. दुसरे काही नाही पण माझ्या शुभेच्छा नेहमीच तुझ्यासोबत आहेत. किती छान प्रवास होता हा! त्याचा भागीदार बनण्याची मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद!”

२०१७ पासून नाओमी व बाजीन सोबत काम करत होते आणि त्यांनी लवकरच यश मिळवले. गेल्या मार्चमध्ये नाओमीने पहिले डब्ल्युटीए विजेतेपद पटकावले आणि त्यानंतर यु.एस. ओपनचे विजेतेपद पटकावले आणि पहिल्यांदाच डब्ल्यूटीए फायनल्ससाठी पात्र ठरली. त्यानंतर पंधरा दिवसांपूर्वीच तिने अॉस्ट्रेलियन ओपन जिंकली आणि क्रमवारीत पहिल्या स्थानी पोहचली. या यशामुळे बाजिन यांना महिला टेनिस संघटना (डब्ल्यूटीए) ने वर्षातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्काराने सन्मानित केले.

नाओमीचे प्रशिक्षकपद स्विकारण्याआधी बाजीन हे सेरेना विल्यम्सचे हिटिंग पार्टनर होते आणि कॕरोलीन वोझ्नियाकी, स्लोन स्टिफन्स व व्हिक्टोरिया अझारेंका यांचे सल्लागार होते.