नाओमी ओसाकाने पुन्हा आवाज उठवला, म्हणाली; ‘दंड झाला तरी पर्वा नाही!’

naomi osaka - Maharashtra Today

क्रीडा जगतात आपली मते रोखठोक मांडणारी आणि अन्याय व दडपशाहीविरुध्द आवाज उठवणारी जपानी टेनिसपटू नाओमी ओसाका (Naomi Osaka) हिने पुन्हा एकदा आवाज उठवला आहे. गेल्या वर्षी रंगभेदाविरूध्द आणि कृष्णवर्णियांच्या दडपशाहीविरुध्द आवाज उठवल्यानंतर तिने आता टेनिसपटूंच्या मनस्वास्थ्यासाठी (mental health) आवाज उठवला आहे आणि फ्रेंच ओपन (French Open Tennis) स्पर्धेपासून प्रत्येक सामन्यानंतरची पत्रकार परिषद करण्यास नकार दिला आहे.

व्यावसायिक टेनिसपटूंना प्रमुख स्पर्धांच्या ठिकाणी सामना संपल्यानंतर अर्ध्या तासाभरात होणाऱ्या पत्रकार परिषदेला, जिंकलेले असो वा हारलेले, उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. यात दुखापत झाली असेल किंवा काही शारीरीक व्याधीच्या कारणाने उपस्थित राहता येणे शक्य नसेल तरच सूट आहे आणि पत्रकार परिषद टाळणाऱ्या खेळाडूला 20 हजार डाॕलरपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे, पण नाओमी ओसाकाला या दंडाची पर्वा नाही. तिने आपण सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदा करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अर्थात नाओमी ओसाका ही आजच्या घडीला जगातील सर्वात धनाढ्य महिला टेनिसपटू असल्याने तिला हे शक्य आहे पण तिने एका चांगल्या हेतूने ठाम भूमिका घेतली आहे हे महत्त्वाचे आहे.

आपल्या या निर्णयामागची भूमिका मांडताना ओसाकाने म्हटलेय की, मी जेंव्हा पत्रकार परिषदांना उपस्थित असते किंवा त्यात भाग घेत असते त्या त्यावेळी मला जाणवते की लोकांना खेळाडूंच्या मनस्थितीबद्दल काहीच देणेघेणे नसते. बऱ्याचदा आम्हाला तेच प्रश्न विचारले जातात ते आधी कितीतरी वेळा विचारलेले असतात आणि आमच्याबद्दल शंका निर्माण करणारे प्रश्न विचारले जातात पण आता मी माझ्याबद्दलच शंका घेणाऱ्या लोकांना संधी न देण्याचा निर्णय घेतला आहे. पराभवानंतर कितीतरी वेळा मी पत्रकार परिषदांमध्ये खेळाडूंचा धीर सुटल्याने त्यांना रडताना बघितलेले आहे. एखादी व्यक्ती नैराश्यात असताना, उदास असताना तिचे मनोबल अधिकच खच्ची करण्याचा हा प्रकार असतो आणि म्हणूनच या पत्रकार परिषदा कशासाठी ते मला कळत नाही. माझ्या या भूमिकेशी फ्रेंच ओपनचा किंवा सुरुवातीपासून ज्या लोकांनी माझ्या मुलाखती घेतल्या आहेत त्यांचा काहीही संबंध नाही. पण त्यांच्या स्पर्धेचे आकर्षण ठरणाऱ्या खेळाडूंच्या मनस्थितीकडे दुर्लक्ष करुन पत्रकार परिषदा करा अन्यथा दंड करू अशी सक्ती केली जाणार असेल तर मला हसण्याशिवाय पर्याय नाही. आणि अशा दंडापोटी माझ्याकडून जमा होणारी रक्कम खेळाडूंच्या मानसिक स्वास्थ्य सुधारणा कार्यक्रमात उपयोगात आणली जाईल अशी मी आशा करते. या जुनाट पध्दतीत बदल गरजेचा आहे.

तो बदल कसा करता येईल यासंबंधी मी या स्पर्धेनंतर वुमेन्स टेनिस असोसिएशन टूर (WTA Tour) आणि टेनिसच्या नियंत्रण संस्थांशी चर्चा करणार आहे. दुर्देवाने हे रोलँड गॕरोसच्या वेळी होतेय हा निव्वळ योगायोग आहे.त्यात या स्पर्धेविरुध्द काहीच नाही. या स्पर्धेबद्दल मला आदरच आहे, असे ओसाकाने स्पष्ट केले आहे. साहजिकच ओसाकाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया उमटल्या आहेत आणि फ्रेंच ओपनच्या आयोजकांनी जगातील या नंबर दोन खेळाडूची ही भूमिका योग्य नसल्याचे म्हटले आहे. मात्र त्यालाही ओसाकाने उत्तर दिले आहे.

तिने फ्रेंच ओपनच्या आयोजकांना कळविले आहे की, फ्रेंच ओपन वा पत्रकारांविरोधात आपली ही भूमिका मुळीच नाही. पण मनस्थिती ठिक नसतानाही पत्राकार परिषदा करण्याची सक्ती करायला लावणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात आपली ही भूमिका आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button