काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात फुलताहेत कमळं

आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यात कशी असतील समीकरणे?

Nandurbar Vidhan Sabha

वर्षानुवर्षे काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या नंदुरबार जिल्ह्यात जागोजागी कमळ फुलू लागली आहेत. विधानसभा निवडणुकीत त्याचीच पुनरावृत्ती होईल अशी चिन्ह आहेत. नंदुरबार लोकसभेची जागा भाजपने सलग दुसऱ्यांदा काँग्रेसच्या हातून हिसकावून घेतली. माजी मंत्री विजयकुमार गावित यांच्या कन्या डॉ. हिना गावित दुसऱ्यांदा खासदार म्हणून मोठ्या मतांनी निवडून आल्या. नंदुरबार विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात डॉ. विजयकुमार गावित यांची कसोटी लागेल. गेल्यावेळी ते 70 हजार मतांनी विजयी झाले होते. मतदारसंघावरील पकड आजही मजबूत असल्याचे त्यांना सिद्ध करावे लागणार आहे. काँग्रेसचे डॉ. राजेश वळवी किंवा कुणाल वसावे यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.

बाजूच्या शहादा मतदारसंघात भाजपचे उदयसिंह पाडवी आमदार आहेत. ते पुन्हा एकदा इच्छुक आहेत पण यावेळी त्यांना घरातूनच आव्हान मिळाले आहे. पोलीस अधिकारी असलेला त्यांचा मुलगा राजेश पाडवी यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. गेल्या वेळी केवळ पंधराशे मतांनी पराभूत झालेले काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांनाच काँग्रेसकडून पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी राष्ट्रवादीचे राजेंद्रकुमार गावित हे तिसऱ्या क्रमांकावर होते. यावेळी पाडवी यांना काँग्रेसची उमेदवारी दिल्यास गावी त्याच्यासोबत असतील असे राजकीय समीकरण आहे.

अक्राणी या मतदारसंघात काँग्रेसचे के. सी.पाडवी सातव्यांदा आमदार आहेत आणि आता आठव्यांदा विधानसभेत पोचण्याची तयारीत करीत आहेत. अलीकडे त्यांनी काँग्रेसतर्फे लोकसभेची निवडणूक लढविली मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. भाजपतर्फे विजय पराडके, किरसिंह  वसावे इच्छुक आहेत. दोघेही राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले आहेत. नंदुरबारचे आमदार विजयकुमार गावित  हे आपली कन्या डॉक्टर सुप्रिया हिला या ठिकाणी उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नात आहेत. युती तुटली तर शिवसेनेतर्फे माजी जिल्हाप्रमुख आमशा पाडवी उमेदवार असू शकतील. याशिवाय भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी हेदेखील इच्छुक आहेत.माजी मंत्री दिलवरसिंह पाडवी यांचे पुत्र आहेत.

नवापूर मतदारसंघात माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांना काँग्रेस पुन्हा संधी देणार की त्यांचे पुत्र आणि आदिवासी साखर कारखान्याचे अध्यक्ष शिरीष नाईक यांना संधी देणार याबाबत उत्सुकता आहे. सुरुपसिंग नाईक यांचा हा बालेकिल्ला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री माणिकराव गावित आणि सुरूपसिंग नाईक यांनी एकत्रित राहत अनेक वर्ष जिल्ह्याचे राजकारण केले. मात्र यावेळी पहिल्यांदाच दोघे वेगवेगळ्या दिशेला जात असल्याचे दिसत आहेत. माणिकराव गावित यांचे पुत्र आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भारत गावित यांनी अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ते भाजपतर्फे उमेदवारीचे सशक्त दावेदार आहेत. नाईक विरुद्ध गावित  हा उत्कंठावर्धक सामना बघायला मिळू शकतो. गेल्यावेळी दुसऱ्या क्रमांकाची मते घेणारे शरद गावित हे यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असल्याने वंचित बहुजन आघाडीतर्फे निवडणूक लढवतील अशी शक्यता आहे.
जिल्ह्यातील चारही जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. त्यामुळे बिगर आदिवासी असलेल्या नेत्यांना या ठिकाणी संधी नाही पण जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा बोलबाला आहे. त्यात प्रमुख्याने विधान परिषदेचे सदस्य आणि काँग्रेसचे नेते चंद्रकांत रघुवंशी, सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि भाजपचे नेते दीपक पुरुषोत्तम पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी आदींचा समावेश आहे. नवापूर आणि नंदुरबार नगरपालिका काँग्रेसच्या हातात आहे तर शहादा आणि तळोदा नगरपालिकेवर भाजपाचे वर्चस्व आहे. जिल्ह्यात भाजपचे दोन आणि काँग्रेसचे दोन आमदार आहेत. सध्या नेतृत्वहीन आणि दिशाहीन वाटत असलेली काँग्रेस आपल्या दोन जागा टिकवून ठेवू शकेल का आणि केंद्र व राज्यात सत्ता असलेला भाजप चारही जागा जिंकू शकेल का हा प्रश्न आहे.