नांदेडात शिवसेना ही काँग्रेसची “बी” टीम – मुख्यमंत्री

नांदेड : नांदेडमधील शिवसेना हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची बी टीम आहे, असा हल्लाबोल करत काँग्रेसच्या इशाऱ्यावर शिवसेना नांदेड महानगरपालिकेच्या मैदानात उतरली आहे. नांदेडमधील शिवसेना अशोक चव्हाण यांच्या तालावर नाचणारी आहे, केवळ भाजपाला पराभूत करण्यासाठीच शिवसेना नांदेडमध्ये निवडणूक लढवत आहे, असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

नांदेड-वाघाळा महापालिकेसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस असून, उद्या मतदान होत आहे. त्याच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांनी आज सभा घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अशोक चव्हाणांवर हल्ला चढवला. अशोक चव्हाणांनी मुंबईत फ्लॅट घेतले, पण नांदेडमधील ५० हजारांहून अधिक कुटुंबांकडे स्वतःचे घर नाही आहे. मुंबईत अशोक चव्हाणांचे फ्लॅट झाले पण नांदेडच्या गरिबांना झोपडी देखील मिळाली नाही. इतकी वर्ष अशोक चव्हाणांनी सत्ता उपभोगली, तरीही नांदेड इतका मागास का, असा प्रश्नही मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थित केला.

नांदेडमध्ये भ्रष्टाचार झाल्याचं कॅगच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अशोक चव्हाणांना आणि काँग्रेसला सत्ता केवळ कमिशन खाण्यासाठी हवी आहे, असा प्रहार मुख्यमंत्र्यांनी केला. राज्यातील नदी प्रदूषण केवळ १० टक्के उद्योगामुळे होते, पण सांडपाण्यामुळे सर्वाधिक नदी प्रदूषित होते. नांदेडचे सांडपाणी शुद्धीकरण करून परळी औष्णिक केंद्राला उपलब्ध करून देणार, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेना आमदार प्रताप चिखलीकर यांचं चांगलंच कौतुक केलं. प्रतापराव चिखलीकरांचं काम हे प्रतापराव गुजरांसारखं आहे, असं फडणवीस म्हणाले. शिवसेना आमदार प्रताप चिखलीकर हे भाजपचा प्रचार करत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या सभेदरम्यान शिवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. मात्र हे कार्यकर्ते अशोक चव्हाणांनी पाठवल्याचा आरोप, मुख्यमंत्र्यांनी केला. नांदेडमध्ये भाजपच जिंकणार, त्यामुळे काँग्रेसच्या पायाखालची जमीन सरकरत आहे, शिवाय शिवसेना दोन जागांवरही जिंकू शकणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.