कोरोना लसीसाठी ‘कोविशिल्ड’ हे नाव वापरण्याविरुद्ध कोर्टात दावा; नांदेड न्यायालयाची सीरम इन्स्टिट्यूटला नोटीस

Court Order To Sii

नांदेड : पुणे येथील ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ (SII) या कंपनीस कोरोना महामारीविरुद्धच्या त्यांच्या प्रस्तावित लसीसाठी ‘कोविशिल्ड’, (COVISHIELD) ‘कोविडशिल्ड’ (COVIDSHIELD) किंवा त्याच्याशी साधर्म्य असलेले कोणतेही नाव वापरण्यास मनाई करावी, अशी मागणी करणारा एक दिवाणी दावा येथील न्यायालयात दाखल करण्यात आला आहे.

नांदेड येथील मे. क्युटिस बायोटेक ( Cutis Biotech ) या कंपनीने त्यांच्या मालक अर्चना आशिष  काब्रा यांच्यातर्फे हा दावा जिल्हा न्यायालयात दाखल केला आहे. त्यात सीरम इन्स्टिट्यूटखेरीज तेलंगणमधील एक व्यापारी बंडारु श्रीनिवास यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे. तदर्थ अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांनी या दाव्यात दोन्ही प्रतिवादींना नोटीस जारी केली असून पुढील सुनावणी १८ डिसेंबर रोजी ठेवली आहे. अ‍ॅड. मिलिंद डी. एकताटे हे वकील वादी कंपनीतर्फे काम पाहात आहेत. मे. क्युटिस बायोटेक कंपनीचा असा दावा आहे की, ‘कोविशिल्ड’ आणि ‘कोविडशिल्ड’ या नावांचा व्यापारी नावे (Trade Name) म्हणून वापर करण्याचा आमचा हक्क आहे व सीरम इन्स्टिट्यूटने त्या नावांचा उपयोग करणे हा ‘ट्रेडमार्क कायद्या’चा भंग आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार ‘कोविशिल्ड’ व ‘कोविडशिल्ड’  या व्यापारी नावांची आमच्या नावे नोंदणी करण्यासाठी आम्ही यंदाच्या २९ जुलै रोजी ट्रेडमार्क रजिस्ट्रारकडे अर्ज केला आहे. आमचा अर्ज प्रलंबित असताना सीरम  इन्स्टिट्यूटने तीच दोन्ही नावे त्यांच्या नावे नोंदविण्यासाठी जूनमध्ये अर्ज केला. आणखी एका कंपनीने त्याच नावांसाठी आधी अर्ज केलेला असल्याने ट्रेडमार्क रजिस्ट्रारने सीरम इन्स्टिट्यूटच्या अर्जावर आक्षेप नोंदविला. या आक्षेपावर निर्णय होईपर्यंत सीरम इन्स्टिट्यूटने ही दोन्ही नावे व्यापारासाठी वापरणे बेकायदा आहे, असे कंपनीचे म्हणणे आहे.

आपण आपल्या कोरोना लसीला जे नाव दिले आहे त्याच नावासाठी दुसऱ्या कंपनीने आपल्याआधी अर्ज केला असल्याने आपल्याला ते नाव मिळू शकत नाही याची कल्पना असूनही सीरम इस्टिट्यूट ते नाव वापरत असल्याने त्यांना तसे करण्यास मनाई करावी, अशी वादी कंपनीची मागणी आहे. ‘कोविशिल्ड’ ही भारतात तयार केलेली पहिली कोरोना प्रतिबंधक लस आहे, असा सीरम इन्स्टिट्यूटचा दावा आहे. या लशीच्या विकास आणि चाचण्यांचे काम पूर्ण झाले असून कंपनीने लसीचा प्रत्यक्ष रुग्णांवर आपात्कालीन वापर सुरू करू देण्यासाठी अर्ज केला आहे, असे सीरम  इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अदर पूनावाला यांनी ७ डिसेंबर रोजी ट्विट केले होते.

लसीच्या कामात भारत सरकार व खासकरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या बहुमोल मदतीसाठी त्यांनी आभारही मानले होते. त्याआधी मोदी यांनी स्वत: पुण्यात सीरम  इन्स्टिट्यूटला भेट देऊन लसीच्या कामाची माहिती करून घेतली होती.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER