नांदेड: स्वारातीम विद्यापीठात विभागीय लोककलावंतांचा मेळावा

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा उपक्रम

नांदेड :- प्रतिनिधी सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन,मुंबई यांच्या वतीने महाराष्ट्रातील लोककला, लोकवाद्य, लोकनृत्य इत्यादींचे संवर्धन, सर्वेक्षण आणि संगणकीय स्वरुपात जतन करण्याची मोहीम मागील काही वर्षांपासून हाती घेण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ललित व प्रयोगजीवी कला संकुलाच्या वतीने सोमवार, दि.10 फेब्रुवारी, रोजी विभागीय लोककलावंतांचा मेळावा आयोजित करण्यात येत आहे.

महाराष्ट्रात एकेकाळी लोककलांच्या माध्यमांतून लोकजागृती, लोकप्रबोधन करणार्‍या कलावंतांना विशेष महत्त्व होते. आज त्यांच्यावर बिकट परिस्थिती आली आहे. पारंपरिक कला आणि कलावंत आपल्या मूळ व्यवसायापासून दुरावली जात आहेत. कृत्रिम स्वरुपाची अत्याधुनिक माध्यमं उपलब्ध झाल्यामुळे लोककला लोप पावत चालल्या आहेत. त्यात प्रामुख्याने अस्वलवाले, माकडवाले, पोपटवाले, गारुडी, वासुदेव, गोंधळी, भारुडी, मसनजोगी, पोतराज, राईंदर, पांगुळ, बहुरूपी, कुडमुडे जोशी, नाथपंथी, वाघ्या-मुरळी, गोसाई, तमाशाकार इत्यादींचा समावेश आहे. त्याचबरोबर लोकनृत्य आणि लोकवाद्यदेखील लुप्त होत आहेत. ज्यात प्रामुख्याने टाळ-चिपळ्या, डमरू, बासरी, ढोलक, तारपा, तुणतुणे, एकतारी, संबळ, दिमडी, पुंगी, झांजरी, हलगी, सनई इत्यादी पारंपरिक वाद्य, तंतुवाद्य, चर्मवाद्य वेगाने नष्ट होत आहेत.

लोककलावंत आणि त्यांच्या अस्सल कलाविष्कारापासून आजची पिढी पूर्णतः अनभिज्ञ होत चालली आहे. मोबाईल व संगणक युगामुळे जग अत्यंत जवळ आले आहे. मनोरंजनाची भूक प्रत्येकांच्या मुठीत सामावली आहे. परंतु नवी पिढी लोककलावंतांच्या मानवतावादी शिक्षणापासून वंचित राहत आहे. आजच्या पिढीला लोककलावंतांची किमान ओळख व्हावी, या हेतूने शासन स्तरावरून विविध प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने लोककलावंताच्या समकालीन प्रश्नांवर मुलभूत चर्चा करण्याचे योजिले आहे.

सोमवार, दि.10 फेब्रुवारी, रोजी या मेळाव्याचे सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी महाराष्ट्रातील लोककलेचे गाढे अभ्यासक डॉ.प्रकाश खांडगे, मुंबई यांचे बीजभाषण होणार आहे. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ.वैजनाथ अनमुलवाड हे करणार आहेत. दिवसभर चालणार्‍या या मेळाव्यात डॉ.जयंत शेवतेकर, (औरंगाबाद) बिभीषण चवरे (संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई) मिनल जोगळेकर(सह-संचालक, मुंबई), सत्येंद्र आऊलवार( जिल्हा समाज कल्याण अधिकारी, नांदेड), डॉ.अनंत राऊत, डॉ.गणेश शिंदे, डॉ.भरत जेठवानी, सुरेश जोंधळे, डॉ.संजय बालाघाटे, डॉ.सुनिल व्यवहारे, डॉ.बालासाहेब दहिफळे हे विविध सत्रांमध्ये मार्गदर्शन करणार आहेत.

विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या अध्यक्षतेखाली समारोप सत्र होईल. यावेळी जिल्हा परिषद नांदेडच्या नवनिर्वाचित अध्यक्षा श्रीमती मंगाराणी सुरेशराव अंबुलगेकर यांच्याहस्ते लोककलावंतांचा विशेष सत्कार होईल. यावेळी कुलसचिव डॉ.सर्जेराव शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.रवि सरोदे, वित्त व लेखाधिकारी डॉ.गोविंद कतलाकुटे यांची विशेष उपस्थिती असेल. या विभागीय मेळाव्यासाठी परिसरातील लोककलावंत, अभ्यासक, विद्यार्थी व नागरिकांनी जास्तीत-जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे समन्वयक, डॉ.वैजनाथ अनमुलवाड यांनी केले आहे.