नाना लागले कामाला ; पक्ष संघटना करणार मजबूत, आंदोलनाचीही घोषणा

Nana Patole

मुंबई : प्रदेश काँग्रेसची (Congress) सूत्रे हाती घेताच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला असून येत्या मंगळवारी होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीत पक्षाची आगामी रणनीती निश्चित  करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली २३ फेब्रुवारी रोजी प्रदेश काँग्रेसच्या निवड मंडळाची (पार्लमेंटरी बोर्ड) बैठक महिला विकास महामंडळ, नरिमन पाईंट येथे होणार आहे. या बैठकीत पक्ष संघटना मजबूत करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. शेतकरी विरोधी काळे कृषी कायदे व इंधन दरवाढीविरोधात आंदोलन व जनजागृती मोहिम राबविण्याबाबतही या बैठकीत रणनीती ठरवली जाणार आहे.

या बैठकीला महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील,विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह निवड मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत.

राज्यातील आगामी ५ महानगरपालिका तसेच ९८ नगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना बांधणीसंदर्भात प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या अध्यक्षतेखाली २४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीबरोबर बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई काँग्रेसचे कार्यालय राजीव गांधी भवन येथे २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. नवी मुंबई शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, दुपारी १२ वा. कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, दुपारी २ वाजता वसई विरार जिल्हा काँग्रेस कमिटी व दुपारी ४ वा कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक घेतली जाणार आहे. तर गुरुवार  २५ रोजी औरंगाबाद ग्रामीण व शहर, भंडारा, गोंदिया व ठाणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक होत आहे. शुक्रवार  २६ फेब्रुवारी रोजी यवतमाळ, चंद्रपूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक घेऊन संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला जाणार आहे तर संध्याकाळी ४ वाजता भिवंडी येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

सत्ता आणि संघटना यांची सांगड घालून पक्षाला जुने वैभवाचे दिवस परत आणण्याचा निर्धार पटोले यांनी व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER