नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा

Nana Patole Resing

मुंबई : नाना पटोले  (Nana Patole) आज विधानसभा अध्यक्षपदाचा (Assembly Speaker) राजीनामा दिला आहे. काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांचे नाव निश्चित झाल्याने राजीनामा दिला. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला. काल पटोले यांनी राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर हालचालींना वेग आला होता. सह्याद्री अतिथीगृहावरून नाना पटोले विधानभवनावर दाखल होत त्यांनी आपला राजीनामा दिला. लवकरच काँग्रेस हायकमांडकडून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

काल बुधवारी नाना पटोले यांनी राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली होती. त्यानंतर त्यांना काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष पद मिळणार अशी चर्चा सुरु झाली होती. सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री, इतर मंत्र्याची भेट घेऊन नाना पटोले आभार मानणार असल्याचे म्हटले जात होते. त्यानंतरच विधानसभेत येऊन नाना पटोले राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात होती. ही शक्यता आज खरी ठरली आहे. आता काँग्रेसचे नवे प्रदेश अध्यक्ष म्हणून नाना पटोले हे असणार आहे.

नाना पटोले यांच्या रिक्त जागेवर तीन काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची नावं चर्चेत आहेत. भोर विधानसभा आमदार संग्राम थोपटे यांचे नाव पुढे आले आहे. थोपटे हे तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे कडवे काँग्रेसचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी मंत्री म्हणून सुद्धा काम केले होते. महाविकास आघाडीत मंत्रिपद न मिळाल्यामुळे संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाची तोडफोड केली होती.

त्यामुळे संग्राम थोपटे यांना संधी देऊन पुणे जिल्ह्यात काँग्रेसला वाढवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. यांची जमेची बाजू जरी असली तरी राष्ट्रवादी त्यांच्या नावाला अनुकूल राहील का याविषयी वेगवेगळे तर्क आहेत. तर दुसरे नाव हे सुरेश वारपूडकर यांचे समोर आले आहे. सुरेश वारपूडकर हे पाथरी मतदारसंघामधून निवडून आले आहेत. 1998 मध्ये कृषी राज्यमंत्री म्हणून काम केलं आहे. परभणीमधून 1998-99 मध्ये खासदार सुद्धा होते. अत्यंत मितभाषी आणि सर्वांशी चांगले राजकीय संबंध ही वारपूडकर यांची जमेची बाजू आहे.

अमीन पटेल हे मुंबईतील आमदार असून ही त्यांची तिसरी टर्म आहे. मुंबादेवी मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केलं आहे. मुस्लिम चेहरा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससाठी फायद्याचा असला तरी शिवसेना मात्र त्यास तयार होईल का याबाबत मात्र शंका व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER