प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नाना पटोले की सुनील केदार?

Nana Patole & Sunil Kedar

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष बदलले जाण्याची दाट शक्यता असून याबाबत दिल्लीत सध्या जोरदार हालचाली सुरू आहेत. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) किंवा पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार (Sunil Kedar), राज्यसभा सदस्य राजीव सातव यांची नावे चर्चेत आहेत. विधानसभेच्या गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला विदर्भात चांगले यश मिळाले होते. त्यामुळे आता नवे प्रदेशाध्यक्ष विदर्भाचे असावेत अशी जोरदार मागणी केली जात आहे. तसे झाले तर पटोले किंवा केदार यांच्यापैकी एकाची वर्णी लागेल. सातव हे मराठवाड्यातील आहेत.सध्याचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या जागी नवा चेहरा देण्याचे ठरले आहे, असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. थोरात यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री अशी दोन पदे आहेत.

एक व्यक्ती एक पद या पक्षाच्या नियमाप्रमाणे त्यांना प्रदेशाध्यक्षपद सोडण्यास सांगितले जाईल व नवा चेहरा दिला जाईल. नाना पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत; पण त्यांनी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्यास तयार असल्याचे पक्षश्रेष्ठींना सांगितले असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. पटोले हे पूर्वी काँग्रेसमध्येच होते व सातत्याने आमदार राहिले; पण नंतर ते भाजपमध्ये गेले आणि २०१४ मध्ये भंडारा-गोंदिया मतदारसंघाचे खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. मात्र पटोले नंतर भाजपमध्ये रमले नाहीत. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्येयधोरणांवर त्यांनी टीका केली. शेवटी ते भाजपमधून बाहेर पडले आणि स्वगृही परतले.

२०१९ ची लोकसभा निवडणूक त्यांनी भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांच्याविरुद्ध नागपुरातून लढविली; पण त्यांचा दारुण पराभव झाला होता. सहा महिन्यांनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते साकोलीमधून विजयी झाले. प्रदेशाध्यक्षपदासाठी सुनील केदार उत्सुक असल्याचे म्हटले जाते. ते नागपूर जिल्ह्यातील सावनेरचे आमदार आहेत. आक्रमक नेता अशी त्यांची ओळख आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १५३ कोटींच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आहेत. पटोले आणि केदार हे दोघेही बहुजन समाजाचे आहेत. भाजपच्या बहुजन व्होट बँकेला धक्का लावण्यासाठी मराठा असलेल्या थोरातांच्या जागी पटोले वा केदार यांना संधी दिली तर बहुजन व्होट बँक आपल्याकडे खेचण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे, असा त्याचा अर्थ होईल. केदार हे महाविकास आघाडी सरकारमध्ये पशुसंवर्धन, दुग्धविकास तसेच क्रीडा व युवक कल्याण विभागाचे कॅबिनेट मंत्री आहेत.

या विभागांमध्ये मंत्री म्हणून फारसे मोठे काही करण्याची संधी नाही. या विभागांना आर्थिक तरतूदही कमी असते. या पार्श्वभूमीवर, प्रदेशाध्यक्षपद मिळाले तर ती केदार यांची एक प्रकारे पदोन्नतीच असेल. पटोले हे प्रदेशाध्यक्ष झाले तर त्यांना विधानसभेचे अध्यक्षपद सोडावे लागेल. तीन पक्षांच्या महाविकास आघाडीत हे पद काँग्रेसच्या वाट्याला गेले आहे. त्यामुळे विधानसभाध्यक्षपदासाठी काँग्रेसला नवा चेहरा शोधावा लागेल. सुनील केदार प्रदेशाध्यक्ष झाले तर त्यांचे मंत्रिपद रिकामे होईल व काँग्रेसमधून एकाला मंत्रिपदाची संधी मिळेल. या निमित्ताने आपल्या एकदोन विद्यमान मंत्र्यांची खाती बदलण्याचा विचार काँग्रेस करेल, अशी शक्यतादेखील आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER