बहुमताचा आकडा नक्की आहे पण…’ नाना पटोलेंच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसबाबत शिवसेनेने व्यक्त केली नाराजी

Nana Patole-CM Uddhav Thackeray

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले (Nana Patole) यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पटोले यांनी अगोदरच विधानसभेच्या सभापतीपदाचा राजीनामा दिला होता. विधानसभा अध्यक्ष कोण होईल याबाबत तीन पक्षाचे सरकार सोनिया गांधी, शरद पवार (Sharad Pawar) आणि ठाकरे हेच चर्चा करतील, अशीही प्रतिक्रिया पटोले यांनी दिली आहे. या घडामोडीवर शिवसेनेने (Shivsena) सामानाच्या अग्रेलखातून काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली आहे .

काँग्रेसने विधानसभा अध्यक्षपद बदलल्याने शिवसेनेने काँग्रेसवर टीका केली आहे. महाविकास आघाडीतील एका पक्षाने दुसऱ्या महत्त्वाच्या पक्षाला घरचा आहेर दिल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत. शिवसेनेने या अग्रलेखातून काँग्रेसच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली असून विधानसभा अध्यक्ष निवडणूक पुन्हा होणार, त्यात मतदान याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

सामनातील आजचा अग्रलेख :

काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद दिले ते पाच वर्षांसाठी. फक्त एक वर्षात राजीनामा देऊन नव्याने निवडणूक घेण्यासाठी नाही. ते काही असले तरी यातून आता मार्ग काढावा लागेल. काँग्रेसने त्यांचा पक्षांतर्गत बदल केला हा त्यांचाच अधिकार; पण सरकार, विधानसभा, बहुमताचा आकडा यावर त्या निर्णयाचा परिणाम होणार नाही यासाठी सावधान राहावे लागेल. काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळत आहे, त्याचबरोबर विधानसभेला नवा अध्यक्ष मिळेल. पटोले हे विधानसभा अध्यक्षपदावरून गेले, पण काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून राज्याच्या मुख्य प्रवाहात परत आले. म्हणजे नाना गेले, नाना आले! नानांना शुभेच्छा!’ अशाप्रकारे शिवसेनेने नानांना शुभेच्छा तर दिल्याच आहेत पण एवढ्या लगेल पद बदल्याबाबत टीकाही केली आहे.

गेल्या दीडेक वर्षात महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला ‘अच्छे दिन’ आल्याने या पक्षाचे नेतृत्त्व करण्याची स्पर्धा लागली आहे. यामध्ये बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून केलेल्या कामाचं कौतुक देखील करण्यात आलं आहे. ‘काँग्रेस पक्षात हे फेरबदल अपेक्षित होतेच. त्यांचा तो अंतर्गत मामला आहे. अर्थात बाळासाहेब थोरात जाऊन पटोले येत आहेत एवढ्यापुरताच हा विषय मर्यादित नाही. दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात काँगेस पक्षाची अवस्था अशी झाली होती की, राज्यात काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारायला कोणी तयार नव्हते. अशा वेळी बाळासाहेब थोरातांनी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारले व अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळविले. आज काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात सत्तेतील महत्त्वाचा भागीदार आहे व पक्षाला संजीवनी मिळाली आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी जोरदार विजय मिळवला. नागपुरात भाजपला असा धक्का देणे हे ऐतिहासिक आहे. काँग्रेसला गेल्या दीडेक वर्षात महाराष्ट्रात ‘अच्छे दिन’ आल्याने या पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी आता स्पर्धाच लागली आहे, पण संकटकाळात बाळासाहेब थोरात यांनी पक्षाची धुरा सांभाळली.

स्वतः नाना पटोले हे मधल्या काळात भारतीय जनता पक्षातच होते. ते तेथून काँग्रेस पक्षात आले व जुन्यांपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने तेथे मिसळून गेले. त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले. नाना हे आता प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत. दिल्लीचा पाठिंबा असल्याशिवाय नानांच्या डोक्यावर हा मानाचा शिरपेच येणे शक्य नाही. ज्याअर्थी विधानसभा अध्यक्षपदावरून नानांना मोकळे केले गेले आणि त्यांच्यावर पक्ष संघटनेची धुरा सोपवली गेली आहे, त्याचा अर्थ असा की, महाराष्ट्रात काँग्रेसला एक आक्रमक चेहरा हवा आहे. अर्थात आक्रमण म्हणजे अतिरेक ठरू नये याचा विचारही काँग्रेसने केलाच असेल’, अशा शब्दात मित्रपक्षाला सल्लाही शिवसेनेकडून देण्यात आला आहे.

काँग्रेसला कायमस्वरुपी अध्यक्ष मिळाला नसल्याची खंत देखील या लेखामध्ये व्यक्त करण्यात आली आहे. अहमद पटेल यांच्या जाण्याने समन्वयकाची भूमिका कोण बजावणार हा सवालही शिवसेनेने उपस्थित केला आहे. दरम्यान महाराष्ट्रातील या बदलाबाबत आणि नव्याने आकड्यांची जुळवाजुळ करण्याबाबत काहीशा मृदू शब्दात नाराजी व्यक्त करत शिवसेनेने म्हटले आहे की, ‘नाना पटोले यांच्या बाबतीत तातडीने निर्णय घेताना आता विधानसभा अध्यक्षपदासाठी पुन्हा निवडणूक घ्यावी लागेल याचाही विचार काँग्रेसच्या हायकमांडने केलाच असेल. कारण विधानसभा अध्यक्षपदासाठी आता पुन्हा निवडणूक घ्यावीच लागेल व पुन्हा एकदा आकडय़ांची जुळवाजुळव नव्याने करावी लागेल. बहुमताचा आकडा नक्कीच आहे. त्याची चिंता करण्याचे कारण नाही, पण आघाडी सरकारात अशा घटनात्मक पदांसाठी शक्यतो पुनः पुन्हा निवडणुका टाळणे सगळय़ांच्याच हिताचे ठरत असते, असे शिवसेनेने म्हटले आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER