
हिंदी सिनेमे फक्त भारतातच लोकप्रिय आहेत असे नाही तर संपूर्ण जगभरात हिंदी सिनेमा प्रचंड लोकप्रिय आहे. हिंदी सिनेमा पाहाणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने विवध देशातील पर्यटन विभाग हिंदी निर्मात्यांशी करार करून त्यांच्या देशात सिनेमाचे शूटिंग करण्यासाठी विविध प्रकारच्या सोयी उपलब्ध करून देतो. त्यामुळेच मुंबईत विविध देशाच्या पर्यटन विभागातर्फे एक्झिबिशनचे आयोजन केले जाते. या एक्झिबिशनमुळे दोन्ही देशातील संस्कृतीची एकमेकांना माहिती होते आणि संस्कृतीचे आदान-प्रदान होते. याच हेतूने भारत आणि नायजेरियाच्या कलाकारांनी एकत्र येऊन एक सिनेमा तयार केला आहे. या सिनेमाचे नाव नमस्ते वहाला (Namaste Wahala) असून याचे दिग्दर्शन हमिशा दरियानी आहूजाने केले आहे.
सिनेमाची कथा आणि दिग्दर्शन हमिशाचेच आहे. ‘नमस्ते वहाला’ चा अर्थ आहे ‘नमस्ते संकट’. हा सिनेमा भारत आणि नायजेरियाच्या संस्कृतीला एकत्र आणणारा सिनेमा आहे. ही एक रोमँटिक कॉमेडी तर आहेच मात्र यात एक अत्यंत महत्वाचा संदेशही लपलेला आहे अशी माहिती हमिशाने दिली. या सिनेमात रुसलान मुमताज नायकाच्या भूमिकेत असून नायिकेची भूमिका इनिमा ओमा ओकीजी साकारीत आहे. रुसलानने बॉलिवूडमध्ये 2007 मध्ये आलेल्या एमपी3 सिनेमातून एंट्री केली होती. सिनेमे आणि मालिकांमध्ये तो सध्या व्यस्त आहे. हमिशाने पुढे सांगितले, हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर दोन्ही देशातील प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. नायजेरियात हिंदी सिनेमे प्रचंड लोकप्रिय असून अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी आजही तेथील प्रचंड लोकप्रिय कलाकार आहेत. तसेच शाहरुख खानचा ‘कुछ कुछ होता है’ आणि ‘कभी खुशी कभी गम’ हे सिनेमेही तेथे प्रचंड लोकप्रिय झालेले आहेत. शाहरुखची लोकप्रियता असल्याने त्याच्यासोबत काम करण्याची इच्छाही हमिशाने व्यक्त केली. ‘नमस्ते वहाला’ नेटफ्लिक्सवर आज रिलीज केला जाणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला