‘नलू’ने शिकवलं रोजचं जगणं

Deepti Ketkar

प्रत्येक कलाकारासाठी त्याला चालून येणारी भूमिका म्हणजे त्या काळापुरतं त्याचं त्या भूमिकेशी समरस होणं असतं. ती भूमिका जगणं असतं. कधीकधी आपल्या स्वभावाच्या अगदी उलट स्वभावाची भूमिका कलाकारांना साकारावी लागते. कलाकार नेहमीच भूमिकेला पडद्यावरचा चेहरा देत असतात हे जरी खरं असलं तरी ती भूमिका कलाकाराला खूप काही शिकवून जात असते. सध्या, येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत नलूमावशी म्हणजेच नलिनी साळवी हे पात्र रेखाटणारी अभिनेत्री दीप्ती केतकर (Deepti Ketkar) हिला सर्वसामान्य घरातल्या महिला रोजचं जगणं कसे जगत असतात हे शिकवलं. कलाकारांचं ग्लॅमरस आयुष्य जगणं हे प्रत्यक्षात किंवा पडद्यावर अनेकदा प्रेक्षक पाहत असतात. पण येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतील नलूने मला रोजचं जगणं काय असतं हा अनुभव घेणाऱ्या महिलांच्या मनापर्यंत पोहोचवलं आणि मी आयुष्यात या भूमिकेची कायम ऋणात राहीन. एक महिला म्हणून माझ्यासाठी ही भूमिका खूप महत्त्वाची आहे.

अभिनेत्री दीप्ती केतकर ही सध्या येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतील नलिनी साळवी या भूमिकेने लोकप्रिय झाली आहे. या मालिकेचे प्रोमो टीव्हीवर झळकायला लागला तेव्हा दीप्तीला अतिशय साध्या गृहिणीच्या रुपात पाहून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर अवाक असे भाव होते. अस्ताव्यस्त केस, अगदी साधीसुधी साडी तीदेखील कमरेला खोचलेली, सतत घरातल्या कामाचा ताण आणि एकूणच कुटुंबाच्या आर्थिक गणिताचं टेन्शन चेहऱ्यावर असलेली नलू अल्पावधीतच प्रेक्षकांना आवडू लागली.

या नव्या व्यक्तिरेखेबद्दल दीप्ती सांगते ,सुरुवातीला जेव्हा मला या भूमिकेची ऑफर आली आणि या भूमिकेचा लूक सांगितला तेव्हा मला देखील सुरुवातीला खूप आश्चर्य वाटलं. आश्‍चर्य यासाठी की सतत आपल्याला पडद्यावर छान दिसण्याची सवय असते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे मला नलू या व्यक्तिरेखेसाठी फार मेकअप करायचा नव्हता. आजूबाजूला सतत कामात असणाऱ्या आपल्या आई ,आत्या, मावशी या कशा दिसतात तसच मला दिसायचं होतं. त्यामुळे सुरुवातीला माझ्या मनावर एक दडपण आलं होतं. पण ही भूमिका करण्यासाठी मी एवढ्या एकाच करण्यासाठी होकार दिला तो म्हणजे मी अशा महिलेचे प्रतिनिधित्व करणार होते जी कधी पुढे पुढे करत नाही. तिच्या कामाचं श्रेय घेत नाही. पण तरीदेखील तिच्यावर सगळा डोलारा उभा असतो. वेळ पडली तर ती पदर खोचून खंबीरपणे तिच्या कुटुंबासाठी उभी राहत असते आणि म्हणून मला ही भूमिका आवडली.

येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतील सगळ्याच कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. सगळेजण सेटवर येतात तेव्हा प्रत्येक जण त्यांच्या त्यांचा लूक कॅरी करण्यासाठी मेकअप, हेअर स्टाईल यामध्ये दंग झालेला असतो. पण दीप्ती केतकर मात्र मेकअप आर्टिस्ट किंवा हेअर स्टायलिस्टला बोलवतच नाही. कारण तिला या सगळ्याची गरज नलूच्या भूमिकेसाठी नाह. दीप्तीच्या चाहत्यांनी आणि ही मालिका पाहणार्‍या प्रेक्षकांनी देखील तिला कमेंटमध्ये विचारले होते की केस विस्कटल्यासारखे नका दाखवू, आम्हाला बघायला कसं तरी वाटतं. पण त्यांना तिने त्या भूमिकेची ती गरज आहे हे पटवून दिलं.

एक गंमत सांगताना दिप्ती केतकर म्हणाली ,एकदा माझ्याकडून थोडासा जास्त मेकअप केला गेला पण कॅमेऱ्याने ते मध्ये दिसून आलं तेव्हा दिग्दर्शकांनी मला मेकअप पुसायला सांगितलं. माझ्या ती गोष्ट लक्षात आली की मेकअपमुळे पहाटे तीन वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत घर कामात असलेली महिला ही वास्तवाला धरून दिसणार नाही आणि मग तेव्हापासून मी इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा जास्त लक्ष हे माझा मेकअप दिसणार नाही याकडे देते. मालिका करत असताना लूक नीट करावे लागतात. प्रत्येक सीनला जाण्यापूर्वी टचअप, हेअर या गोष्टी बघितल्या जातात पण ही व्यक्तिरेखा माझ्या आयुष्यात अशी आलेली आहे की मी सीन करायला जाताना केस ठिक करण्या ऐवजी ते विस्कटल्यासारखे करते आणि मेकअप दिसत असेल तर चेहरा थोडा घामेजला दिसेल याचा प्रयत्न करते. आत्तापर्यंतच्या व्यक्तिरेखाच्या विरोधात ही व्यक्तिरेखा असल्यामुळे करायला खूप मजा येते.

नलूची ऑफर आली तेव्हा दीप्तीच्या डोळ्यासमोर तिची आजी उभी राहिली. या मालिकेमध्ये दीप्तीच्या कमरेला एक कापड खोचलेलं नेहमी दिसतं. ही सवय तिने आजीकडूनच उचलली. ज्या बायका सतत कामात असतात त्यांच्या कमरेला नेहमी एक कापड खोचलेलं असतं. शिवाय दीप्तीच्या घरी काम करण्यासाठी जी बाई येते तिच्या चालण्या-बोलण्याचं निरीक्षण तिने केलं. जेणेकरून हे पात्र अधिक जवळचं वाटावं यासाठी वेगळ्या प्रकारचा अभ्यास केला.

बाल कलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात आलेल्या दीप्तीला नृत्याची खूप आवड आहे. ती शास्त्रीय नृत्य शिकलेली आहे तसेच तिने फ्रान्समध्ये झालेल्या एका आंतरराष्ट्रीय लोकनृत्य स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व देखील केलं होतं. भागो मोहन प्यारे, कमला, अभिलाशा या मालिकेतील दीप्ती केतकरची भूमिका गाजली होती. आता एका नव्या लूक’मध्ये तिच्या चाहत्यांना भेटण्यासाठी आलेली आहे . नेहमीच प्रेक्षकांना आपल्या आवडत्या अभिनेत्रींना ग्लॅमरस लूकमध्ये पाहायची उत्सुकता असते पण दीप्तीचं अतिशय साधं रूप तिच्या चाहत्यांना सुखावत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER