नागपूर मनपा निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेची नवी टीम जाहीर

CM Uddhav Thackeray - NMC

नागपूर : २०२२मध्ये होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा विजयरथ रोखण्यासाठी शिवसेनेनं आतापासूनच पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. नागपूर जिल्ह्यासाठी शिवसेनेनं (Shiv Sena) नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नाव जाहीर केली आहेत. यात नागपूर सहसंपर्क प्रमुखपदी शेख सावरबांधे आणि सतिश हरडेंची नियुक्ती करण्यात आली आहे. तर व्यावसायिक प्रमोद मानमोडे यांची प्रभारी महानगरप्रमुख म्हणून वर्णी लावण्यात आली आहे. मात्र शिवसेनेचे माजी खासदार प्रकाश जाधव (Prakash Jadhav) यांना यातून बाजूला करण्यात आले आहे.

नागपूर महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. २०२२च्या सुरुवातीला नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. नागपूर महापालिकेच्या राजकारणात सध्या काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) हेच दोन प्रमुख पक्ष आहे. पण गेल्या काही दिवसांपासून नागपुरात शिवसेना चांगलीच सक्रीय झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नागपूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती जाहीर केल्या आहेत.

त्यानुसार नागपूर महानगरातील प्रभारी महानगप्रमुखपदी व्यावसायिक प्रमोद मानमोडे तर नागपूर दक्षिण आणि दक्षिण-पश्चिमच्या महानगर संघटकपदी मंगेश काशीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर नागपूर पश्चिम आणि मध्यसाठी महानगर संघटक म्हणून किशोर पराते, नागपूर उत्तर आणि पूर्वसाठी विशाल बरबटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर नागपूर मध्य, दक्षिण आणि दक्षिण पश्चिम या भागातील शहरप्रमुख म्हणून दीपक कापसे तर नागपूर उत्तर, पूर्व आणि पश्चिमसाठी नितीन तिवारी यांची वर्णी लागली आहे.

त्याशिवाय नागपूर उत्तरमधील उपमहानगरप्रमुख म्हणून बंडू तलवेकर, नागपूर पूर्वमधून गुड्डू रहांगडाले, नागपूर पश्चिममधून दिगंबर ठाकरे यांची वर्णी लागली आहे. तर सहसंपर्कप्रमुख म्हणून सतीश हरडे, शेखर सावरबांधे आणि किशोर कुमेरिया यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान शिवसेनेचे माजी खासदार प्रकाश जाधव यांना मात्र या नियुक्त्यातून वगळण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER