उपमुख्यमंत्र्याविना भरणार नागपूर अधिवेशन

Uddhav And Ajit Pawar Editorial

badgeसारे ठरल्यानंतरच सरकारची स्थापना केली जाईल असे महाविकास आघाडीचे नेते सांगत होते. पण काहीही ठरले नसताना आघाडीने सरकार बनवले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ६ मंत्र्यांसह स्वतःचा शपथविधी उरकून घेतला. पण त्यांना खाते वाटलेले नाही. त्यामुळे ते ६ जण कामाला सुरुवात करू शकत नाहीत. खातेवाटप आणि उरलेले मंत्रिमंडळ बनवताना आघाडीच्या नेत्यांची दमछाक सुरु आहे.

उपमुख्यमंत्री नसलेले अर्धवट सरकार अशा अवस्थेत मुख्यमंत्र्यांना नागपूर अधिवेशनास जावे लागत आहे. उपमुख्यमंत्र्याचे पद राष्ट्रवादीच्या कोट्यात आले आहे. पण उपमुख्यमंत्री कोणाला करायचे ते राष्ट्रवादीत ठरत नसल्याने मंत्रिमंडळाचा विस्तारच पुढे ढकलायची नामुष्की उद्धव सरकारवर ओढवली आहे. सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाच्या ह्या पदासाठी अजितदादा आणि जयंत पाटील यांच्या जोरदार रस्सीखेच सुरु आहे. अजितदादांनी दबाव वाढवल्याने अस्वस्थ राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार चक्क दिल्लीला निघून गेले. राष्ट्रवादीत केवळ उपमुख्यमंत्रीपदासाठीच नव्हे तर मंत्री होण्यासाठीही प्रचंड स्पर्धा आहे. त्यामुळे शरद पवार नागपूर अधिवेशनानंतरच म्हणजे २२ डिसेंबरनंतर निर्णय करतील असे प्रफुल्ल पटेल यांना सांगावे लागले.

देवेंद्र यांच्या बाउंसर्सनी फोडला घाम

‘आमचा सारा कारभार पारदर्शक असेल’ अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव देतात. पण तसे काहीही नाही. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून सुरु होत आहे. अधिवेशनात सरकारला विरोधकांच्या तोफेला सामोरे जावे लागते. पण इथे अजून उद्धव सरकारचा गृहमंत्री, अर्थमंत्री… काहीही ठरलेले नाही. मंत्र्यांची नावं ठरवण्यासाठी बाळासाहेब थोरात दिल्लीला सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी गेले आहेत. तीन पायांच्या ह्या सरकारची विचित्र अवस्था आहे.

नागपूर अधिवेशनात जनहिताच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी ७ जणांच्या मंत्रिमंड्ळात तात्पुरते खातेवाटप करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. मजबुतीचा, स्थिरतेचा आव आणणाऱ्या सरकारची कशी केविलवाणी अवस्था आहे याचा हा नमुना आहे. आपल्या पुतण्याला उपमुख्यमंत्री करायला शरद पवार विशेष उत्सुक नाहीत. याची कुणकुण लागल्याने अजितदादा आक्रमक झाले आहेत. अजितदादांना उपमुख्यमंत्री बनवले नाही तर सरकारला स्थेर्य मिळणार नाही ह्या काळजीने उद्धव ठाकरे यांचे टेन्शन वाढले आहे.