नागपूर अधिवेशन लांबणार?

Badgeनागपूर करारानुसार दरवर्षी हिवाळ्यात सरकार नागपुरात येते, २-३ आठवड्याचे अधिवेशन घेते. यंदाही हे अधिवेशन ९ डिसेंबरपासून घेण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे प्रशासनाने तयारीही चालवली होती. पण सत्तास्थापनेतील कोंडीमुळे नव्या सरकारचीच अनिश्चितता आहे. त्यामुळे नागूपर अधिवेशन होणार की पुढे ढकलणार? याची चर्चा आहे.

शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसल्याने सत्तास्थापनेचा नवा प्रयोग राज्यात रंगतो आहे. दोन काँग्रेसला सोबत घेऊन शिवसेना सरकार स्थापणार आहे. ह्या तिघांचे सत्तेचे सूत्र ठरत नसल्याने नव्या सरकारचा ठावठिकाणा नाही. नवे सरकार आठ दिवसात स्थापन झाले तर नागपूर अधिवेशन वेळेवर सुरु होऊ शकते. पण काँग्रेस सावध पावले टाकत असल्याने इतक्या लवकर नव्या सरकारचे येणे अवघड दिसते. राज्यपालांनी ६ महिने वेळ दिल्याने तशीही घाई नाही.

सध्या दोन्ही काँग्रेसचे नेते चर्चा करीत आहेत. अजून शिवसेनेसोबत ते बसलेले नाहीत. ऐनवेळी निरोप आला तरी आम्ही अधिवेशन करू शकतो असे प्रशासनाचे म्हणणे आहे. दरवर्षी अधिवेशन होत असल्याने अधिवेशनासाठी काय काय करावे लागते याची प्रशासनाला जाणीव आहे. सारे सुरळीत होईल ह्या अंदाजाने प्रशासनाने अधिवेशनाची तयारी सुरूही केली होती. पण घोळ झाला. आता तर राष्ट्रपती राजवट लागली आहे. राष्ट्रपती राजवट उठल्याशिवाय नवे सरकार आणि नव्या सरकारचे अधिवेशन शक्य नाही.

राजकीय समीक्षकांच्या मते, तिन्ही पक्षांना सत्तेचे सूत्र ठरवण्यात किमान १५ दिवस लागतील. एखाद्या मुद्यावर वाद झाला तर मामला लटकू शकतो. सत्तेत बसण्याची शिवसेनेला घाई असली तरी काँग्रेस प्रत्येक मुद्यावर सावध चालू पाहते आहे. त्यामुळे सध्या सारेच अस्थिर आहे. अशा हवेत नागपूर अधिवेशन पुढे ढकलले जाऊ शकते.