‘तुम्ही कारवाई करून दाखवाच’, भाजप खासदार नाना पटोले यांचे पक्ष नेतृत्वाला आव्हान

नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर टीका करणारे गोंदिया-भंडारा लोकसभा मतदार संघातील दबंग भाजप खासदार नाना पटोले यांनी पक्ष नेतृत्वाला आव्हान देताना म्हटले आहे कि, ‘तुमच्यात धमक असेल तर कारवाई करूनच दाखवा’

पटोले आज नागपुरात होते. ते म्हणाले, ‘जर शेतक-यांच्या प्रश्नावर बोलणे तसेच पक्ष सरकाच्या चुका दाखविणे पक्षविरोधी कारवायाचा सदरात मोडत असेल तर पक्षाने माझ्याविरुद्ध कारवाई करावी.’

यवतमाळ जिल्ह्यातील टिटवी गावातील आत्महत्याग्रस्त शेतकरी प्रकाश मानगावकर यांच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली. प्रकाश यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये मोदी सरकार आणि कर्जमाफीच्याबाबत लिहून ठेवले आहे. मोदी सरकारपासून या शेतक-यांचा भ्रमनिरास झाल्याचे या चिठ्ठीतून दिसत आहे तसेच राज्यातील फडणवीस सरकारने कर्जमाफी देण्यात लावलेल्या विलंबामुळे त्यांची निराशा झाल्याचे या चिठ्ठीतून दिसून येत असल्याचे बोलले जात आहे.

मृतकांच्या कुटुंबियाप्रती आपल्या संवेदना व्यक्त करताना पटोले म्हणाले, शेतक-यांच्या लढ्यासाठी गरज भासली तर राजीनामा देण्याची माझी तयारी आहे. शेतक-यांच्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीत होत असलेल्या विलंबाबद्दल त्यांनी पक्षावर टीका केली.

शनिवारी मानगांवकर या शेतक-याने गावातील एका सागवनाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. एवढे टोकाचे पाऊल उचलताना त्याने सागवनाच्या पानावर आत्महत्येसंबंधी राजकीय टीकात्मक काही लिहीले होते. त्याने या पानावर ‘मोदी सरकार’ लिहीले होते दुस-यावर ‘कर्जमाफी’ लिहीले होते. सरकारने शेतक-यांना कर्जमाफीची घोषणा केल्यानंतरही शेतकरी आत्महत्या या होतच आहे. शेतक-यांच्या समस्येबाबत सरकार असंवेदनशील असल्याचे पटोले म्हणाले.

खासदार पटोले यांच्याअनुसार राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार शेतक-यांच्या समस्यांबाबत असंवेदनशील असल्याने शेतक-यांमध्ये निराशा वाढत आहे. या सरकारपासून त्यांचा भ्रमनिरास झाल्याने ते आत्महत्या करत असल्याचे ते म्हणाले.

राज्यातील शेतक-यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी खासदार पटोले यांचा 23 सप्टेंबर रोजी वेगवेगळ्या संघटनांची नागपुरात बैठक घेण्याची योजना असून सरकारला कोंडीत पकडण्याची पुढील योजना यावेळी आखल्या जाईल.

एका प्रश्नाच्या उत्तरात पटोले यांनी स्पष्ट केले कि, आपण आपल्यावर पक्षाकडून होणा-या संभाव्य कारवाईबाबत आपल्याला चिंता नाही. उलट आपण पक्षाकडून अशा प्रकारच्या कारवाईची वाट पाहत असल्याचे पटोले म्हणाले. आपण मोदी विरुद्ध केलेल्या वक्तव्याबाबत राज्याचे पक्षाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचेशी बोलल्याची कबुलीही पटोले यांनी दिली.

दोन आठवड्यापूर्वी पटोले यांनी शेतकरी आत्महत्या तसेच ओबीसीच्या मुद्दावर मोदींसमोर प्रश्न उपस्थित केला असता पंतप्रधान त्यांच्यावर रागावले होते. मोदी यांना प्रश्न विचारणे आवडत नाही त्यांनी हा प्रश्न विचारले असता ते त्यांच्यावर रागावले होते, असे पटोले म्हणाले. मी बैठकीत हरीत कर आणि शेती क्षेत्रात आणखी गुंतवणुक करण्याबाबत सूचना केली असता मोदी माझ्यावर रागावले होते आणि मला ‘शट-अप’ म्हटले होते, असेही पटोले म्हणाले.

भाजप खासदार 2014 च्या लोकसभा निवडणुकीत जायंट किलर म्हणून पुढे येत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रफुल पटेल यांचा त्यांच्या गोंदिया-भंडारा लोकसभा मतदार संघाच्या बालेकिल्ल्यात पराभव केला होता.

पटोले यांनी आपले राजकीय करीअर भंडारा जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून सुरु केले. 1995 साली त्यांना काँग्रेसने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी विधानसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविली होती. यात त्यांचा भाजप उमेदवाराकडून पराभव झाला होता. मात्र 1999 आणि 2004 च्या राज्यातील निवडणुकीत ते लाखांदूर येथील काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते.

यानंतर त्यांनी भाजपत प्रवेश केला आणि 2009 च्या विधानसभा निवडणुकीत ते विदर्भातून सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले होते. पटोले यांचा जन्म भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील सुकळी या गावात झाला. ते कृषी अधिका-याचे पुत्र असून त्यांचे एक भाऊ पोलिस उपअधिक्षक आहेत. यवतमाळ येथील शिवसेना खासदार भावना गवळी या त्यांचे वडील बंधू यांची मेव्हणी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेव्यतिरिक्त त्यांनी नागपूरनजिकच्या उमरेड येथील करांडला वन्यजीव अभयारण्य येथील वाघ गायब झाल्याप्रकरणी पक्ष नेतृत्वावर टीका केली होती. जय नावाचा हा वाघ हरवला होता. त्याच्या मागावर शिकारी होते. मात्र वनअधिका-यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला होता. मात्र त्यांनी आपल्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ पुरावा दिला नाही. त्यांनी विदर्भाला वेगळ्या राज्याचा दर्जा मिळावा म्हणून लोकसभेत खाजगी सदस्य ‍विधेयक सादर केले होते. यानंतर पक्ष नेतृत्वाला धक्काच बसला होता. मागील आठवड्यात पटोले यांनी राज्याचे वरिष्ठ महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शेतक-यांसदर्भात केलेल्या वक्तव्यावर पटोले यांनी टीका केली होती.