आघाडी सरकार पाच वर्षे टिकावे हीच अपेक्षा- प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar-nagpur

नागपूर :- एनआरसी, एनआरपी विरोधातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी एकत्रित येऊन चर्चा करावी आणि लढा उभा करावा, असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज नागपुरात व्यक्त केले. पत्रकार क्लबच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मीट द प्रेस या कार्यक्रमात ते बोलत होते.

केंद्र सरकारने देशात नागरिकत्व कायदा लागू केला आहे. मात्र या कायद्याची झळ मुस्लिम समाजापेक्षा हिंदू समाजाला मोठ्या प्रमाणात बसणार आहे. आसाम येथे केल्या गेलेल्या नोंदणीत जवळपास १९ लाख लोकांचे नागरिकत्व धोक्यात आले आहे. यात मुस्लिम समाजातील ५ लाख तर, १४ लाख हिंदू नागरिकांचा समावेश आहे. त्यामुळे या कायद्याचा सर्वांत  मोठा फटका हिंदू समाजाला बसणार हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने येत्या २४ तारखेला राज्यात बंदची हाक दिली आहे. तसेच जी राज्ये  या कायद्याच्या विरोधात असतील त्या राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी एकत्र येत चर्चा करावी, राष्ट्रपतींना निवेदन सादर करून त्याच्या विरोधात भूमिका घ्यावी, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी त्यांनी काँग्रेस आणि इतर राष्ट्रीय पातळीवर असलेल्या पक्षांनाही याच्या विरोधात जाण्याचे आवाहन केले. या पक्षांनी स्वतंत्र लढा द्यावा, नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी पक्षातील कार्यकर्त्यांना आदेश द्यावा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

एनआरसी-एनआरपीबाबत शिवसेनेनं आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही, याबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले की, माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दोनदा चर्चा झाली आहे. राज्यातील मुस्लिम आणि इतर समाजातील नागरिकांना या कायद्याचा फटका बसणार नाही, असे आश्वासन मला देण्यात आले आहे, असेही ते म्हणाले. तसेच इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बांधण्यात येणार आहे. नव्या सरकारने या पुतळ्याची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बांधकाम निधीही जास्त लागणार आहे. मात्र हा निधी स्मारकासाठी न वापरता मुंबईत असलेल्या वाडिया रुग्णालयाला देण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. तसेच हे आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकावे हीच आपली अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.

औरंगाबाद : सीएए ,एनआरसी कायद्याविरोधात महिलांचे आंदोलन