
मुंबई :- बायकोच्या आजारपणामुळे फेब्रुवारी महिन्यात पॅरोलवर सुटलेल्या अरुण गवळीला पुढच्या पाच दिवसांत नागपूर मध्यवर्ती कारागृहात शरण येण्याचे आदेश देण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हे आदेश दिले आहे.
कुख्यात गुंड अरुण गवळीला नागपूर उच्च न्यायालयाने दणका दिला असून पाच दिवसांत नागपूर मध्यवर्ती कारागृहात शरण येण्याचा आदेश दिला आहे. अरुण गवळीने २४ तासांत मुंबई प्रशासनाकडे नागपूर प्रवास करण्याची परवानगी मागावी. ती परवानगी एका दिवसात मंजूर करावी आणि त्यानंतर तीन दिवसांत नागपूर गाठावे, असा आदेश हायकोर्टाने दिला आहे. यापुढे पॅरोलला मुदतवाढ देण्याबाबत कोणतीही याचिका स्वीकारली जाणार नाही, असेही हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.
फेब्रुवारी महिन्यात अरुण गवळी पॅरोलवर बाहेर आला. मात्र त्याच काळात लॉकडाऊन जाहीर झाल्याने त्याचा पॅरोलचा कालावधी संपल्यानंतरही मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर आतापर्यंत प्रत्येक वेळी त्याने पॅरोल वाढवण्याची विनंती केली होती. तीन वेळा मुदत वाढवून शेवटची मुदतवाढ २४ मे रोजी संपली. त्यानंतर त्याला तुरुंगात जाऊन आत्मसमर्पण करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. मात्र, आपण या काळात कोणतेही गैरकृत्य अथवा लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केले नसल्याचं सांगत पुन्हा पॅरोल वाढवून देण्याची विनंती कोर्टासमोर केली होती. मात्र, मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने पॅरोल वाढवून देण्यास नकार दिला होता. आता यापुढे पॅरोलला मुदतवाढ देण्यासंबंधीची कोणतीही याचिका स्वीकारली जाणार नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला