राष्ट्रवादीची समजूत काढली तर आता शिवसेना नाराज; नागपूर पदवीधर मतदारसंघात नाट्यमय राजकारण

NCP - Shiv Sena

नागपूर : नागपूर (Nagpur) पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकासआघाडीत निर्माण झालेले नाराजीनाट्य पुन्हा पाहायला मिळाले . सुरुवातीला या मतदारसंघात काँग्रेसला (Congress) उमेदवारी दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) स्थानिक कार्यकर्ते नाराज झाले होते. त्यांच्याकडून निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार उतरवण्याची तयारी सुरु होती. अखेर काँग्रेस नेत्यांनी मध्यस्थी करून हा तिढा सोडवला. मात्र, आता त्यानंतर शिवसेनेचे (Shiv Sena) स्थानिक नेते नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघात महाविकासआघाडीकडून (Mahavikas Aghadi) काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, हा मतदारसंघ काँग्रेसला सोडल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी नाराज होते. पदवीधर मतदारसंघाचा अर्ज भरण्याचा गुरुवार हा शेवटचा दिवस होता. तरीदेखील काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा की नाही, यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चा सुरु होती . अखेर काल काँग्रेसच्या नेत्यांनी मध्यस्थी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने नरमाईची भूमिका घेतली आहे.

मात्र, काल अभिजित वंजारी यांचा अर्ज भरतेवेळी निमंत्रण दिले नाही म्हणून शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आता रुसून बसले आहेत. शिवसेनेच्या या नेत्यांनी निवडणुकीत सहकार्य न केल्यास काँग्रेसपुढे अडचण निर्माण होऊ शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER