अंबानींच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांचे नागपूर कनेक्शन!

Mukesh Ambani

नागपुर : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेरील आढळलेल्या गाडीतले जिलेटीन हे नागपुरातल्या कंपनीत बनल्याचे पोलीस तपासात समोर आले, ही माहिती कंपनीचे चेअरमन सत्यनारायण नुवाल यांनी दिली आहे. यासंदर्भात मुंबई क्राईम ब्रांचच्या (Mumbai Crime Branch) अधिकाऱ्यांनी नुवाल यांच्याशी फोनवर चर्चा केली. सोलर इंडस्ट्रीजकडून ज्यांना जिलेटीन देण्यात आली, याबद्दलची माहिती जाणून घेतली.

सोलर इंडस्ट्रीने पोलिसांना माहिती दिली

सोलर इंडस्ट्री कंपनीकडे प्रॉडक्ट असतात. या प्रॉडक्टची मागणी एक्सप्लोजीव डिपार्टमेंटला येते आणि त्यानंतर ती कंपनीकडे येते.  त्यामुळे सगळे रेकॉर्ड असतात. आतापर्यंत ज्या लोकांना जिलेटीन दिले आहे, त्यांची माहिती पोलिसांनी देण्यात आली आहे, असे सत्यनारायण नुवाल यांनी सांगितले.

स्फोटकांनी भरलेल्या कारमध्ये पत्र

दरम्यान, अंबानी यांच्या बंगल्याबाहेर स्कॉर्पिओ गाडीत काही स्फोटके सापडली. तसेच घातपाताच्या उद्देशाने ठेवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ही गाडी सात-आठ दिवसांपूर्वी चोरी झाली, अशी तक्रारही विक्रोळी पोलीस ठाण्यात दाखल असल्याची माहिती आहे. पार्क केलेल्या गाडीत स्फोटकांच्या बॅगसोबत एक पत्रही पोलिसांना मिळाले. या पत्रातून मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देण्यात आली आहे. “डियर नीता भाभी और मुकेश भैय्या और फॅमिली.. ये तो सिर्फ ट्रेलर है, अगली बार ये सामान पुरा होगा तुम्हारे फॅमिली को उडाने….संभल जाना…” असा मजकूर या पत्रात आहे.

गाडीत अनेक नंबरप्लेट्स

बुधवारी मध्यरात्री मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्कॉर्पिओ आणि इनोव्हा अशा दोन गाड्या आल्या होत्या. दुकानाच्या एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही दृश्ये  कैद झाली. यापैकी स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके होती. ही गाडी त्यांच्या घराबाहेर पार्क केल्यानंतर चालक गाडीतून उतरला आणि इनोव्हा गाडीत बसून निघाला. गाडीत पोलिसांना काही नंबरप्लेट्सही मिळाल्या. या  नंबरप्लेट्सचा  अजूनही उलगडा झाला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER